हत्येचा प्रयत्नासह खंडणीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक
खंडणीसाठी मटण विक्रेत्यावर हल्ला केला होता
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – हत्येचा प्रयत्नासह खंडणीसाठी धमकी दिल्याच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या राजकुमार ऊर्फ रामसुरत कश्यप या आरोपीस एमएचबी पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून अटक केली. गुन्हा दाखल होताच राजकुमार हा गेल्या दहा वर्षांपासून फरार होता, त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती, अखेर दहा वर्षांनी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. खंडणीची रक्कम देण्यास नकार दिला म्हणून त्याच्यासह त्याच्या सहकार्याने एका मटण विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला केला होता. याच गुन्ह्यांत यापूर्वी मोहम्मद शमी शब्बीर हसन खान याला पोलिसांनी अटक केली असून तो सध्या जामिनावर असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर राजकुमारला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ख्वाजा रहिम कुरेशी हा दहिसर येथील कांदरपाडा, एलबीएस नगरातील आदर्श आझाद चाळीत राहत असून त्याचा मटण विक्रीचा व्यवसाय आहे. राजकुमार आणि मोहम्मद शमी हे दोघेही त्याच्या परिचित असून ते एकमेकांच्या ओळखतात. ऑगस्ट २०१४ रोजी ते दोघेही त्याच्या दुकानात आले होते. तिथे मटण विक्रीचा व्यवसाय करायचा असेल तर त्यांना दरमाह खंडणी द्यावी लागेल अशी धमकीच त्यांनी त्याला दिली होती. मात्र ख्वाजाने या दोघांनाही खंडणीची रक्कम देण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. याच वादातून ऑगस्ट महिन्यांत ख्वाजा कुरेशी याच्यावर या दोघांनी प्राणघातक हल्ला केला होता. लोखंडी रॉडसह लाथ्याबुक्यांनी केलेल्या मारहाणीत ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्याला जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ही माहिती मिळताच एमएचबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी ख्वाजा कुरेशीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह खंडणीसाठी धमकी देणे तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते. त्यांचा शोध सुरु असताना मोहम्मद शमीला ऑगस्ट २०१४ रोजी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या जामिनावर बाहेर आहे.
मात्र गुन्हा घडल्यानंतर राजकुमार हा गेल्या दहा वर्षांपासून फरार होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना वॉण्टेड असलेल्या राजकुमार हा त्याच्या बोरिवलीतील गणपत पाटील नगरातील राहत्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जायभाये, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश वळवंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन शिंदे (गुन्हे), किरण सुरसे (जनसंपर्क), गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश तोरगल, तडीपार कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र शिंदे, एटीसी विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब सिद्धे, पोलीस शिपाई गौस मोमीन, अविनाश राठोड यांनी राजकुमारला त्याच्या घरातून अटक केली. अटकेनंतर त्याला शनिवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या दहा वर्षांत त्याने इतर काही गुन्हे केले आहे का याचा पोलीस तपास करत आहे.