बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून कोट्यवधी रुपयांचा पर्दाफाश
फॉरेक्स मार्केट ट्रेडिंगद्वारे अनेक गुंतवणुकदारांची फसवणुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास हमखास गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करणार्या मालाड परिसरातील एका बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. या टोळीने आतापर्यंत अनेक गुंतवणुकदारांकडून पैसे घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत एका मुख्य आरोपीसह चौदा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन लॅपटॉप, सोळा डेस्टॉप, दोन मोबाईल, गुन्ह्यांतील कागदपत्रे असा सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या चौदाजणांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने मुख्य आरोपीस पोलीस तर इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गेल्याच आठवड्यात गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी जोगेश्वरी आणि गोरेगाव परिसरातील तीन कॉल सेंटरमध्ये छापा टाकला होता. ही कारवाई ताजी असताना मालाड परिसरात एक बोगस कॉल सेंटर सुरु आहे. या कॉल सेंटरमध्ये विदेशातील फॉरेक्स मार्केटमध्ये अनेकांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांची फसवणुक होत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विकास मोरे यांना मिळाली होती. ही माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी त्याची गंभीर दखल घेत संबंधित कॉल सेंटरवर कारवाई करण्याचे आदेश प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांना दिले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्यासह पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार प्रजापती, मधुकर धुतराज, संग्राम पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ, पोलीस हवालदार चव्हाण, किणी, काकडे, कुरकुटे, कांबळे, पोलीस शिपाई सटाले, बिडवे, साळवे, होळंबे, महिला पोलीस शिपाई भिताडे यांनी मालाड येथील चिंचोली बंदर, क्वॉटम टॉवर इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील कॉन्टिक इन्फोटेक कंपनीत छापा टाकला होता.
यावेळी तिथे असलेल्या मुख्य आरोपीसह चौदांजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत या कॉल सेंटरमध्ये ऑनलाईन मॅच ट्रेडर ऍपद्वारे लोकांची वैयक्तिक माहिती प्राप्त केले जात होते. त्यानंतर त्यांना ऑनलाईन ऍपद्वारे कॉल करुन युनायडेट किंगडम (इंग्लंड) या देशातील एका खाजगी कंपनीतून बोलत असल्याचे सांगून त्यांना फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून जास्त परवाता देण्याचे गाजर दाखवून त्यांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले जात होते. त्यांना विविध बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करुन त्यांना मूळ रक्कमेसह परतावा न देता त्यांची फसवणुक केली जात होती. अशा प्रकारे या टोळीने आतापर्यंत अनेकांना गुंतवणकीच्या नावाने कोट्यवधी रुपयांना गंडा घातला होता. त्यानंतर या चौघांविरुद्ध भारतीय न्याय सहिता तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली होती. या टोळीने गेल्या काही महिन्यांत अनेकांना फॉरैक्स मार्केट ट्रेडिंगच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे बोलले जाते.