फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड तोतया पोलिसाला अटक
कॅश घेऊन ऑनलाईन पैसे पाठविल्याचा मॅसेज पाठवून फसवणुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – पोलीस असल्याची बतावणी करुन वैद्यकीय गरज असल्याचे सांगून महिलांसह विशेषता वयोवृद्धांकडून कॅश घेऊन ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर केल्याचा मॅसेज पाठवून फसवणुक करणार्या पुण्याच्या एका तोतया पोलिसाला खार पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. पुष्कर रविंद्र कुलकर्णी असे या २६ वर्षीय आरोपीचे नाव असून तो अशा प्रकारच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. खारसह दादर, अंधेरी व इतर ठिकाणी रविंद्रने अशाच प्रकारे काही फसवणुकीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी पंधरा हजाराची कॅश, दोन मोबाईल, वेगवेगळ्या बँकेचे नऊ एटीएम कार्ड, पोलीस विभागासह राज्य शासनाचे ओळखपत्र जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी सांगितले.
निरा राजेशकुमार दुबे ही ३५ वर्षांची महिला ही खार येथील गोळीबार रोड परिसरात राहते. शुक्रवारी ४ ऑक्टोंबरला दुपारी ती एटीएम सेंटरमध्ये कॅश भरण्यासाठी आली होती. तिथे तिला रविंद्र भेटला होता. त्याने तो पोलीस असल्याचे त्याच्या डेबीट कार्डवरुन पैसे ट्रान्स्फर होत नाही. त्यामुळे तुम्ही पैशांची मदत करा, मी तुम्हाला ऑनलाईन पैसे पाठवितो. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल असे सांगितले. तो पोलीस समजून तिने त्याला विश्वासाने वीस हजार रुपये दिले होते.त्यानंतर त्याने तिला वीस हजार रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर केल्याचे स्क्रिनशॉट दाखविले होते. त्यानंतर तो तेथून निघून गेला होता. मात्र ऑनलाईन पैसे न पाठविता त्याने तिची फसवणुक केली होती. हा प्रकार नंतर निरा दुबे या महिलेच्या लक्षात येताच तिने खार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तोतया पोलिसाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तोतयागिरी करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक वैभव काटकर, पोलीस उपनिरीक्षक हणमंत कुंभारे, पोलीस हवालदार भरत काचे, दिनेश शिर्के, पोलीस शिपाई योगेश तोरणे, महेश लहामगे, मयुर जाधव आणि मनोज हांडगे यांनी पुष्करला अंधेरी येथून ताब्यात घेतले. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला पोलिसांनी अटक केली.
तपासात पुष्कर हा पुण्याच्या कात्रज, भारती विद्यापीठ, दत्तनगर रोडच्या स्वागत कॉर्नर रेसीडन्सीचा रहिवाशी आहे. तो एटीएममध्ये कॅश भरण्यासाठी येणार्या महिलांना विशेषता वयोवृद्धांना पोलीस असल्याचे भासवत होता. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांना पोलिसांचे ओळखपत्र दाखवत होता.त्याचे डेबीट कार्ड काम करत नसून त्याला वैद्यकीय उपचारासाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे तो संबंधित महिलांसह वयोवृद्धाकडून कॅश घेऊन त्यांच्या खात्यात ऑनलाईन पैसे पाठवत असल्याचे सांगून स्वतच्या मोबाईलवर प्रँक पेटीएम या ऍपच्या माध्यमातून रक्कम प्राप्त झाल्याचे मॅसेज पाठवत होता. त्याने दादर, अंधेरी, खार व इतर ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी सांगितले. त्याच्या अटकेने अशाच तोतयागिरीसह फसवणुकीच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.