मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – बोरिवलीतील सोनल स्पामध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी विभागाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी स्पाच्या मॅनेजरसह दोघांना पोलिसांनी अटक केली. जुगेश्वर कमता साव आणि संतनकुमार साहू यादव अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी बोरिवली पोलिसाकडे सोपविण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली असून त्यांना कांदिवलीतील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या गुन्ह्यांत रामलखन यादवसह अन्य एका व्यक्तीला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या आरोपीविरुद्ध भारतीय न्याय सहितेसह पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
बोरिवलीतील एस. व्ही रोड, कोरा केंद्राजवळील सुमेरनगरच्या तळमजल्यावर सोनल स्पा ऍण्ड सलून (ग्लॅमर टच स्पा) नावाचे एक स्पा आहे. या स्पामध्ये काम करणार्या महिलांच्या मदतीने सेक्स रॅकेट सुरु असून या महिलांना स्पामध्ये येणार्या ग्राहकांसोबत वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती अंमलबजावणी विभागाला मिळाली होती. या माहितीनंतर बोगस ग्राहकाच्या माध्यमातून त्याची शहानिशा करण्यात आली होती. त्यानंतर या पथकाने गुरुवारी सायंकाळी सोनल स्पामध्ये छापा टाकला होता. यावेळी तिथे असलेल्या मॅनेजर जुगेश्वर साव आणि मदतनीस व वॉचर म्हणून काम करणार्या संतनकुमार या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. स्पामध्ये पोलिसांना दोन महिला सापडल्या. त्यांच्या चौकशीत तिथे स्पाच्या नावाने सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करुन त्यांना पुढील चौकशीसाठी बोरिवली पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. दोन्ही महिलांची मेडीकलनंतर कांदिवलीतील महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. घटनासथळाहून पोलिसांनी ११ हजार २०० रुपयांची कॅश, चार मोबाईल, शूटींगचे एक मेमरी कार्डसह इतर मुद्देमाल जप्त केला. अटकेनंतर दोन्ही आरोपींना शुक्रवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.