मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचा तपास सुरु असतानाच या हत्येमागे बिष्णोई टोळी असल्याचा मुंबई पोलिसांचा संशय होता. या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला असताना सोशल मिडीयावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात बाबा सिद्धीकी यांच्या हत्येची जबाबदारी विष्णोई टोळीने स्विकारली आहे. सोशल मिडीयावर पोस्ट अपलोड करुन बिष्णोई टोळीने ही हत्या त्यांच्याच शूटरने केल्याचा दावा केला आहे. या पोस्टची सध्या मुंबई पोलिसांकडून शहानिशा सुरु आहे.
बाबा सिद्धीकी यांच्या हत्येला २४ तास उलटूनही या हत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नव्हता. दोन्ही शूटरच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले तरी मुंबई पोलिसाकडून अजूनही अधिकृत खुलासा केलेला नाही. हा तपास सुरु असताना रविवारी सोशल मिडीयावर एका पोस्ट व्हायरल झाली होती. त्यात बाबा सिद्धीकी यांच्या हत्येमागे बिष्णोई टोळीच असल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्या अकाऊंटवरुन हा मॅसेज पाठविण्यात आला आहे. ते अकाऊंट बिष्णोई टोळीच्या एका सदस्याचे बोलले जाते. ज्या दोन मारेकर्यांना पोलिसांनी अटक केली, ते दोघेही बिष्णोईच्या संपर्कात होते, त्याच्याच आदेशावरुन त्यांनी बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यामुळे या पोस्टची मुंबई पोलिसांकडून सत्यता पडताळून पाहिली जात आहे. ही पोस्ट बिष्णोई टोळीकडून पोस्ट झाली की कोणीतरी खोडसाळपणा म्हणून ती सोशल मिडीयावर व्हायरल केली आहे याचा तपास सुरु आहे. सलमान खान याच्या घरासमोर झालेल्या गोळीबारानंतर अशाच प्रकारे बिष्णोई टोळीने हा गोळीबार आपण केल्याचा दावा करताना सोशल मिडीयावर एक पोस्ट व्हायरल केली होती. बाबा सिद्धीकी हे दाऊद इब्राहिमशी संबंधित होते, त्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा दावाही पोस्टमध्ये करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये अनुज थापनचा उल्लेख करण्यात आला आहे. अनुजला सलमान खान याच्या घरासमोर झालेल्या गोळीबाराच्या कटात पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीत असताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अनुजने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे असा आरोप करुन त्याचा हत्येचा बदला घेण्यात आला आहे असे नमूद केले आहे.
इतर आरोपी पोलिसांच्या रडारवर
बाबा सिद्धीकी यांच्या हत्येसाठी मारेकर्यांना आर्थिक मदतीसह शस्त्रे कोणी पुरविले याचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. या हत्येचा कट कोणी, कुठे आणि कधी रचला याचीही माहिती काढण्याचे काम सुरु आहे. तिन्ही मारेकरी पुण्यातील हडपसर आणि मुंबईतील कुर्ला परिसरात वास्तव्यास होते, त्यांच्या राहण्याची व्यवस्था कोणी केली होती. या संपूर्ण हत्येसाठी त्यांना किती रुपये मिळाले. कोणाला किती रुपये मिळाले. हत्येनंतर त्यांना आणखीन काही रक्कम मिळणार होती, ती रक्कम किती होती. या कटात या तिघांसह इतर सात ते आठजणांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय आहे. ते सर्व आरोपी पोलिसांच्या रडारवर आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.