बाबा सिद्धीकी हत्याप्रकरणी प्रविण लोणकरला कोठडी
मारेकर्यांना आर्थिक मदतीसह शस्त्रे पुरविल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – राष्ट्रवादीचे नेते झियाउद्दीन अब्दुल रहिम सिद्धीकी ऊर्फ बाबा सिद्धीकी यांच्या हत्येतील तिसरा आरोपी आणि पुण्यातून अटक केलेल्या प्रविण लोणकरला सोमवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सोमवार २१ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याचा भाऊ शुभम लोणकर हा फरार असून या दोन्ही बंधूंनी हत्येसाठी मारेकर्यांना आर्थिक मदतीसह शस्त्रे पुरविल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यांत बिष्णोई टोळीचा सहभाग असल्याचा पहिल्यांदाच सरकारी वकिलांनी दावा केला आहे. त्यामुळे बाबा सिद्धीकी यांच्या हत्येमागे बिष्णोई टोळीच असल्याचे आता उघडकीस आले आहे.
शनिवारी १२ ऑक्टोंबरला वांद्रे येथे तीन अज्ञात मारेकर्यांनी बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येनंतर काही तासांत पळून जाणार्या गुरमेल बलजीत सिंग आणि धर्मराज राधे कश्यप या दोघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांचा ताबा खंडणीविरोधी पथकाला सोपविण्यात आला होता. त्यांच्या चौकशीतून त्यांचा तिसरा सहकारी आणि शूटर शिवकुमार गौतम ऊर्फ शिवा, मोहम्मद जिशान अख्तर, शुभम लोणकर, प्रविण लोणकर यांचे नाव समोर आले होते. लोणकर बंधू हे पुण्यात राहत असल्याने गुन्हे शाखेची एक टिम पुण्याला गेली होती. रविवारी रात्री उशिरा प्रविण लोणकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत प्रविण व त्याचा भाऊ शुभम यांनीच तिन्ही मारेकर्यांना हत्येसाठी शस्त्रे पुरविल्याचे उघडकीस आले होते. जानेवारी महिन्यांत शुभमला घातक शस्त्रांसह पुणे पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो काही महिने जेलमध्ये होता. नंतर त्याला जामिन मंजूर झाला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर तो जून महिन्यांपासून फरार झाला होता. दोन्ही लोणकर बंधू बिष्णोई टोळीसाठी काम करत होते असे तपासात उघडकीस आले होते. त्यानंतर प्रविणला पोलिसांनी पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले होते.
याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर त्याला सोमवारी दुपारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकिलांनी लोणकर बंधू हे बिष्णोई टोळीशी संबंधित असल्याचा आरोप करताना त्यांनी हत्येसाठी तिन्ही शूटरला शस्त्रे पुरविल्याचे सांगितले. शुभम हा मुख्य आरोपी असून तो सध्या फरार आहे. त्यामुळे तो कुठे आहे हे फक्त प्रविणला माहित आहे. त्याचा शोध घेण्यासाठी प्रविणची पोलीस कोठडी आवश्यक आहे असे सांगून त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र आरोपीच्या वकिलांनी प्रविणचा या गुन्ह्यांशी काहीही सबंध नाही. काहीही झाले तरी त्याला पोलीस ताब्यात घेतात. चौकशीनंतर सोडून देतात. शस्त्रे शुभमने पुरविले असले तरी त्याचा या गुन्ह्यांत काहीही संबंध नाही. गुन्ह्यांच्या दिवशी तो त्याच्या घरी होता. त्याची दूधाची डेअरी असून तो एक सामान्य माणूस आहे. शुभमला अटक करण्याऐवजी पोलीस प्रविणला विनाकारण त्रास देऊन ताब्यात घेत आहेत. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. या गुन्ह्यांत त्याला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले आहे असा आरोप केला. त्यामुळे त्याला कमीत कमी पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने प्रविणला २१ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता तिन्ही आरोपींना सोमवारी पुन्हा लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे.