मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी) – राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या चार आरोपींना हरियाणा आणि पुण्यातून अटक केली. अमीत हिसमसिंग कुमार, रुपेश राजेंद्र मोहोळ, करण राहुल साळवे आणि शिवम अरविंद कोहाड अशी या चौघांची नावे आहेत. यातील अमीत कुमारला बुधवारी किल्ला कोर्टाने ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली तर इतर तिघांना गुरुवारी दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या चार आरोपींच्या अटकेने या गुन्ह्यांत अटक केलेल्या आरोपींची संख्या चौदा झाली आहे. सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसाकडून चौकशी सुरु आहे.
दसर्याच्या दिवशी वांद्रे येथे बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यांत तपास खंडणीविरोधी पथकाकडे येताच या पथकाने वेगवेगळ्या परिसरातून दहा आरोपींना अटक केली होती. त्यात गुरमेल बलजीत सिंग, धर्मराज राधे कश्यप, प्रविण रामेश्वर लोणकर, हरिशकुमार बालकराम निशाद, नितीन गौतम सप्रे, प्रदीप दत्तू ठोंबरे, चेतन दिलीप पारधी, संभाजी किसन पारधी, राम फुलचंद कनोजिया, भगवतसिंग ओमसिंग यांचा समावेश आहे. त्यांच्या चौकशीत त्यांच्या इतर काही सहकार्यांची नावे समोर आली होती. त्यात अमीत कुमार याचा समावेश होता. अखेर त्याला मंगळवारी पोलिसांनी अटक केली.
अमीत हा मूळचा हरियाणाच्या कैथल, कलायतच्या बट्टा गाव, नथवनपट्टी, गोमा माडी मंदिराजवळील रहिवाशी आहे. या गुन्ह्यांतील एक वॉण्टेड आरोपी मोहम्मद जिशान अख्तर याचा तो खास सहकारी आहे. जून महिन्यांत मोहम्मद जिशान पंजाबच्या पटियाला जेलमधून सुटून आल्यानंतर तो कैथालला गेला होता. तिथेच त्याची अमीतशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. त्यानेच अमीतची राहण्यापासून सर्व व्यवस्था केली होती. त्यानंतर तो सतत मोहम्मद जिशानसोबत फिरत होता. बाबा सिद्धीकी यांच्या कटाची माहिती अमीतला होती. त्यासाठी त्याच्या बँक खात्यात अडीच लाख रुपये पाठविण्यात आले होते. ही रक्कम त्याने मोहम्मद जिशानला दिली होती. त्याने ती रक्कम शुभम आणि नंतर प्रविण लोणकरला दिली होती. याच पैशांतून शस्त्रे खरेदीसह इतर खर्च करण्यात आला होता. अमीत आणि यापूर्वीचा आरोपी गुरमेल हे दोघेही एकाच गावचे रहिवाशी आहे. मोहम्मद जिशानने गुरमेलची शूटर म्हणून नियुक्ती केली होती तर अमीत हा तिथे दारु ठेका चालवत होता असेही तपासात उघडकीस आले आहे.
बाबा सिद्धीकी यांच्या हत्येच्या एक आठवड्यापूर्वीच मोहम्मद जिशान हा कैथलमधून पळून गेला होता. मात्र अमीत पोलिसांच्या हाती सापडला. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सोमवार ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुण्यातून अन्य तिघांना अटक करण्यात यश
अमीत कुमारच्यास अटकेने गुन्हे शाखेची एक टिम पुण्याला पाठविण्यात आली होती. या पथकाने सायंकाळी पुण्यातून तीन संशयितांना ताब्यात घेतले होते. रुपेश मोहोळ, करण साळवे आणि शिवम कोहाड अशी या तिघांची नावे आहेत. तिन्ही आरोपी शुभम आणि प्रविण लोणकर यांच्या संपर्कात होते. हत्येसाठी त्यांनी लोणकर बंधूंच्या सांगण्यावरुन तिन्ही शूटरला आर्थिक मदतीसह त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. या कटात या तिघांचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्यांच्या अटकेसाठी एक टिम पुण्याला पाठविण्यात आली होती. या पथकाने सायंकाळी रुपेश मोहोळ, करण साळवे आणि शिवम कोहाड यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांचा सहभाग उघडकीस आल्यानंतर तिघांना पोलिसांनी अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले होते. या गुन्ह्यांत त्यांना गुरुवारी किल्ला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्याच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या आता चौदा झाली आहे. या गुन्ह्यांत शिवकुमार गौतम, शुभम लोणकर आणि मोहम्मद जिशान अख्तर हे फरार असून ते तिघेही कटातील मुख्य आरोपी असल्याचे बोलले जाते. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.