चार वर्षांच्या मुलाची लाथ्याबुक्यांनी मारहाण करुन हत्या
खेळताना पॅण्टमध्ये लघुशंका केली म्हणून मारहाण केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – चार वर्षांच्या मुलाची लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कुर्ला परिसरात उघडकीस आला आहे. ओमकार छोटूकुमार चंद्रवंशी असे या चार वर्षांच्या मुलाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी रितेशकुमार अजय चंद्रवंशी या २१ वर्षांच्या आरोपीस नेहरुनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला कुर्ला येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. रितेशकुमार हा मृत ओमकारच्या आईचा प्रियकर असून खेळताना पॅण्टमध्ये लघुशंका केली म्हणून त्याने त्याची मारहाण करुन हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
ही घटना शनिवारी दुपारी एक वाजता ते रविवारी सायंकाळी पावेसहाच्या दरम्यान कुर्ला येथील नेहरुनगर, शिवराय सेवा मंडळाच्या साबळेनगरात घडली. याच परिसरातील पत्रा चाळीत पूजाकुमारी छोटूकुमार चंद्रवंशी ही २५ वर्षांची महिला तिच्या सहा आणि चार वर्षांच्या दोन मुले साक्षीकुमारी आणि ओमकार यांच्यासोबत राहते. ती हॉटेलमध्ये जेवण बनविण्याचे काम करते. तिचे २००६ साली छोटूकुमारशी विवाह झाला होता. मात्र विवाहानंतर त्यांच्यात सतत खटके उडत होते. गेल्या वर्षी मे महिन्यांत ती तिच्या दोन्ही मुलांसोबत तिच्या बिहारच्या पटना येथील गावी गेली होती. तिथेच तिची रितेशकुमारशी ओळख झाली होती. तो तिच्या मामाच मुलीचा मुलगा आहे. ओळखीनंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दुसरीकडे पतीसोबत सतत होणार्या भांडणानंतर त्यांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ती रितेशकुमार व तिच्या दोन्ही मुलांसोबत कुर्ला येथे राहण्यासाठी आली होती. तेव्हापासून ते दोघेही तिथे लिव्ह ऍण्ड रिलेशनशीपमध्ये राहत होते. २६ ऑक्टोंबरला ती नेहमीप्रमाणे कामावर निघून गेली होती. यावेळी रितेशकुमार हा घरी झोपला होता तर तिचे दोन मुले बाहेर खेळत होते.
खेळताना तिचा चार वर्षांचा मुलगा ओमकारने पॅण्टमध्ये लघवी केली होती. हा प्रकार रितेशकुमारला समजताच त्याने त्याला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. कामावरुन आल्यानंतर तिला हा प्रकार तिच्या मुलाकडून समजताच तिने त्याला तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर त्याला घरी पाठविण्यात आले होते. या घटनेनंतर तिने रितेशकुमारला जाब विचारण्याच प्रयत्न केला, मात्र तो तिला काहीच न बोलता घरातून निघून गेला होता. याच दरम्यान ओमकारला पुन्हा वेदना होऊ लागले. त्यामुळे तिने त्याला पुन्हा सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान ओमकारचा मृत्यू झाला होता.
ही माहिती मिळताच नेहरुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी पूजाकुमारीची जबानी नोंदवून पोलिसांनी तिचा प्रियकर रितेशकुमारविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी कुर्ला येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.