बिल्डरला २२ लाखांना गंडा घालणार्या आरोपीस अटक
गुंतवणुकीच्या बहाण्याने गंडा; आरोपीची पत्नी सहआरोपी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून एका बिल्डरला सुमारे २२ लाखांना गंडा घातल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या एका आरोपीस विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. अजहर कमल हाश्मी असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत अजहर हाश्मीची पत्नी रुक्सार अजहर हाश्मी हिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून तिचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
७७ वर्षांचे काशिप्रसाद गजाधर रिंगेसिया हे व्यवसायाने बिल्डर असून विलेपार्ले परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. याच परिसरात त्यांचे एक खाजगी कार्यालय आहे. २०१८ साली त्यांची अजहर हाश्मीशी ओळख झाली होती. या ओळखीत त्याने तो एका नामांकित बँकेत रिलेशन मॅनेजर म्हणून कामाला असल्याचे तसेच त्याची पत्नी रुक्सारची ए. आर फायनान्स नावाची एक कंपनी असून ही कंपनी अनेकांना अर्थपुरवठा करत असल्याचे सांगितले होते. या दरम्यान त्यांची चांगली मैत्री होऊन कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. दोन वर्षांपूर्वी अजहर हा त्यांच्या विलेपार्ले येथील कार्यालयात आला होता. यावेळी त्याने त्यांना त्याच्या पत्नीच्या कंपनीत गुंतवणुकीचा सल्ला देताना त्यांना गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगितले होते.
अजहरसोबत काही वर्षांत चांगले संबंध निर्माण झाल्याने त्यांनीही कुठलाही विचार न करता त्याच्या पत्नीच्या कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. याबाबत त्यांच्यात एमओयू झाला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी रुक्सारच्या बँक खात्यात २४ लाख २५ हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना दोन लाख रुपये परत करण्यात आले, मात्र काही महिने उलटूनही त्यांनी गुंतवणुकीवर परतावा दिला नाही. विचारणा केल्यानंतर ते दोघेही पती-पत्नी त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी त्यांना प्रतिसाद देणे बंद केले होते. त्यांच्यासोबतचा व्यवहार न पटल्याने त्यांनी त्यांच्याकडे गुंतवणुक केलेल्या २२ लाख २५ हजाराची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी पैसे परत केले. त्यांनी दिलेल्या धनादेशाचे बँक खाते त्यांनी आधीच बंद केले होते. तसेच कुर्ल्यातील राहत्या घरातून ते दोघेही दुसरीकडे शिफ्ट झाले होते.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दोघांविरुद्ध विलेपार्ले पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अजहर आणि रुक्सार यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोघांचा शोध सुरु केला होता. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या अजहर हाश्मीला अखेर पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने फसवणुकीच्या उद्देशानेच तक्रारदारांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केल्याची कबुली दिली आहे.