सॅण्डलवरुन सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश
पती-पत्नीला अटक; पत्नीविरुद्ध सहा गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – गर्दीच्या वेळेस रेल्वेने प्रवास करणार्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करणार्या एका जोडप्याचा पर्दाफाश करण्यात दादर रेल्वे पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत रोशनी साईराज मोरे आणि साईराज भरत मोरे या पती-पत्नीला रेल्वे पोलिसांनी अटक केली असून रोशनीच्या पायाच्या सॅण्डलवरुन तिची ओळख पटली. ही महिला रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तिच्याविरुद्ध दादर, ठाणे, कुर्ला रेल्वे स्थानकात सातहून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी सांगितले. झटपट श्रीमंत होण्यासाठी तिने सोनसाखळी चोरी करण्यास सुरुवात केली होती, दागिने विक्रीसाठी तिचा पती तिला मदत करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
प्रियांका स्वप्नील सोनवले ही तक्रारदार महिला बदलापूरला राहते. २५ ऑक्टोंबरला सायंकाळी साडेसहा वाजता ती दादर रेल्वे स्थानकातील फलाट दहावर कर्जत फास्ट लोकलच्या महिला डब्ब्यात चढत होती. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात महिलेने तिच्या गळ्यातील २८ हजार रुपयांची सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरी केले होते. हा प्रकार लक्षात येताच तिने दादर रेल्वे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात महिलेविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गेल्या काही दिवसांत सकाळी आणि सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळेस सोनसाखळीसह वॉलेट चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे या गुन्ह्यांची पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर शिरसाट यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धर्मेंद्र आवारे, पोलीस उपनिरीक्षक रमेश सिद्राम सूर्यवंशी, पोलीस हवालदार गावकर, आव्हाड, महिला पोलीस हवालदार दळवी, सूर्यवंशी, शेख, महिला पोलीस नाईक अभंग, पोलीस नाईक शेंडे, पोलीस शिपाई राठोड, चव्हाण, जगदाळे, गांधले, निकाळे यांनी तपास सुरु केला होता.
रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता एक बुरखाधारी महिला संशयास्पदरीत्या जाताना दिसली. तिचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस येताच तिचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. तपासादरम्यान या महिलेने दिवा रेल्वे स्थानकातून प्रवास सुरु केल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या पथकाने दिवा रेल्वे स्थानक आणि आसपासच्या परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. यावेळी ती महिला एका पुरुषासोबत स्कूटीने तसेच एका इमारतीमध्ये जाऊन तिचा बुरखा काढून इमारतीमधून निघून जात असल्याचे दिसून आले होते. स्कूटीची नंबर प्लेट स्ष्टपणे दिसत नव्हता. मात्र एका विशिष्ठ प्रकारच्या मार्कवरुन या स्कूटीचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. याच फुटेजवरुन तिच्या पायातील सॅडलवरुन संशयित महिला तीच बुरखाधारी असल्याचे उघडकीस आले होते. ही शोधमोहीम सुरु असतानाच पोलिसांनी रोशनी मोरे आणि साईराज मोरे या पती-पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत रोशनी हिने गुन्ह्यांची कबुली दिली.
रोशनी ही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ती गर्दीच्या वेळेस रेल्वे प्रवासादरम्यान महिलांचे मंगळसूत्र आणि सोनसाखळी चोरी करत होती. यापूर्वी तिला रेल्वे गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली होती. तिच्या अटकेने कुर्ला आणि ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यातील सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते. जामिनावर बाहेर आल्यानंतर ती पुन्हा सक्रिय झाली होती. अल्पावधीत श्रीमंत होण्यासाठी रोशन ही सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेस सोनसाखळी चोरी करत होती. चोरी केलेले दागिने ती तिचा पती साईराजला विक्रीसाठी देत होती. पोलिसांनी पकडू नये तसेच तिची ओळख पटू नये म्हणून ती नेहमी बुरखा घालत होती. चोरी करण्यापूर्वी आणि नंतर ती जवळच्या इमारतीमध्ये जाऊन बुरखा घालत आणि काढत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. स्वतची ओळख लपविण्यासाठी तिने बरेच प्रयत्न केले, मात्र तिच्या सॅण्डलवरुन तिची ओळख पटविण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. याच सॅण्डलने तिचा घात केला आणि तिच्यासह तिच्या पतीला अटक करण्यात पोलिसांना यश आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी सांगितले.