दोघांच्या भांडणात मध्यस्थी तरुणाच्या जिवावर बेतली
तरुणाची लाथ्याबुक्यासह तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – परिचित असलेल्या दोघांच्या भांडणात मध्यस्थी करणे एका तरुणाच्या जिवावर बेतल्याची घटना ऍण्टॉप हिल परिसरात घडली. विवेक कन्हैय्यालाल गुप्ता असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्याची पाचजणांच्या टोळीने बांबू, लाथ्याबुक्यांसह तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली. याप्रकरणी ऍण्टॉप हिल पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून एका महिलेसह पाचजणांना अटक केली आहे. त्यात कार्तिक आर मोहन देवेंद्र, त्याची पत्नी, कार्तिक कुमार देवेंद्र, मिनीअप्पण रवी देवेंद्र यांचा समावेश आहे. अटकेनंतर या पाचही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान क्षुल्लक कारणावरुन भांडणात मध्यस्थी करणार्या तरुणाच्या हत्येने परिसरात प्रचंड शोककळा पसरली होती.
विवेक आणि अटक आरोपी एकाच परिसरातील रहिवाशी असून एकमेकांच्या परिचित आहेत. बुधवारी ३१ ऑक्टोंबरला रात्री बारा वाजता विवेक हा त्याचा मित्र विशाल राधेश्याम जैस्वाल याच्यासोबत ऍण्टॉप हिल येथील कोकरी आगार, जय महाराष्ट्र नगर परिसरात होता. याच दरम्यान कार्तिक आर मोहनचे मोनू नावाच्या एका तरुणासोबत क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले होते. यावेळी तिथे असलेल्या विवेकने मध्यस्थी करत या दोघांमधील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने कार्तिक आर मोहनसह इतर चौघांनी विवेकला बांबूसह लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली. काही वेळाने त्यातील एकाने त्याच्याावर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. या हल्ल्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे उपचार सुरु असताना विवेकचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच ऍण्टॉप हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी विशाल जैस्वालची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीतून घडलेला प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी पाचही आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना शुक्रवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.