इमारतीच्या प्रोजेक्टमध्ये पार्टनरशी ऑफर करुन फसवणुक
३५ कोटीच्या फसवणुकीप्रकरणी दोन विकासकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – माझगाव येथे सुरु असलेल्या एका निर्माणधीन इमारतीच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून दोन बंधूंसोबत पार्टनरशीपचा करार करुन सुमारे ३५ कोटीचा फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संजय राकुमार छाब्रिया आणि राहुल शहा या दोन्ही विकासकाविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही रेडिअम सुमेर डेव्हल्पर्सचे संचालक आहेत. या गुन्ह्यांचा तपास बीकेसी पोलिसाकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहेत. त्यामुळे या दोघांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
६७ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार महेश वलिराम मिराणी हे वांद्रे येथील शेर्ली राजन रोड, सनमिस्ट सोसायटीमध्ये राहतात. फेब्रुवारी २०१७ रोजी त्यांची रेडियम सुमेर डेव्हल्पर्सचे संचालक संजय छाबिया आणि राहुल शहा यांच्याशी ओळख झाली होती. त्यांच्या कंपनीकडून माझगाव येथील हर्बर हाईट्स या निर्माणधीन इमारतीचे बांधकाम सुरु होते. हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी त्यांनी फायनान्सची गरज होती. त्यामुळे त्यांनी त्यांना त्यांच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. तसेच त्यांच्यासोबत पार्टनरशीप करुन त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांची ऑफर आवडल्याने महेश मिराणी यांनी त्यांच्या भावासोबत त्यांच्यासोबत पार्टनरशीपमध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. चर्चेअंती त्यांच्यात मेट्रो इनव्हेस्टमेंट पार्टनरशीप नावाचे एक कंपनी सुरु करण्यात आली होती. ठरलेल्या कराराप्रमाणे महेश मिराणी यांनी कंपनीच्या बँक खातयत सुमारे २२ कोटीची गुंतवणुक केली होती.
दोन वर्षांत या गुंतवणुकीवर त्यांना ३५ कोटी रुपये देण्याचे करारात नमूद करण्यात आले होते. मात्र दोन वर्षांत त्यांनी इमारतीचे बांधकाम पूर्ण केले नाही. तसेच करारात ठरल्याप्रमाणे त्यांना मूळ रक्कमेसह परतावा दिला नाही. प्रोजेक्टमध्ये गुंतवणुक केलेल्या रक्कमेचा या दोघांनी वैयक्तिक फायद्यासाठी वापर करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच मिराणी बंधूंनी त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र या दोघांकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अशा प्रकारे राहुल शहा आणि संजय छाब्रिया यांनी इमारतीच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुक प्रवृत्त करुन मिराणी बंधूंची सुमारे ३५ कोटीची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.