पायधुनीतील खाजगी पतपेढीतील तिजोरी चोरट्याने पळविली
१९.६३ लाखांचे सोन्याचे दागिन्यासह कॅश चोरीला गेले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – पायधुनीतील एका खाजगी पतपेढीतील तिजोरीच अज्ञात चोरट्याने पळविल्याची घटना उघडकीस आली आहे. सोन्याच्या दागिन्यांसह कॅश असा १९ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रामचंद्र सखाराम पवार हे मानखुर्दच्या महाराष्ट्रनगर, हनुमान चाळीतील रहिवाशी आहे सध्या ते पायधुनीतील सॅम्युअर स्ट्रिट, इंदू चेेबर्समध्ये असलेल्या हनुमान नागरी पतपेढी मर्यादीतमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. तिथे एकूण पाच कामगार कामाला असून पतपेढीचे अध्यक्ष शंकर किसन पवार आहेत. या पतपेढीत ग्राहकांना सोने तारण ठेवून कर्ज दिले जात असून कर्जाची परतफेड केल्यानंतर त्यांना त्यांचे सोने परत दिले जाते. ग्राहकांकडून आलेले सोने भुलेश्वर येथील एका खाजगी बँकेत जमा केले जाते. जुलै २०२४ रोजी ऑडिट असल्याने बँकेत ठेवलेले सर्व सोने त्यांच्या पतपेढीत आणण्यात आले होते. ऑडिट झाल्यानंतर ते सोने तिजोरीत ठेवण्यात आले होते. ऑडिटनंतर काही ग्राहकांना सोने तारण कर्ज देण्यात आले होते. त्यामुळे जवळपास २५ तोळे सोने आणि काही कॅश तिजोरीमध्ये ठेवण्यात आले होते.
३० ऑक्टोंबरला दिवसभरातील कामकाज संपल्यानंतर सर्व कर्मचारी पतपेढी बंद करुन घरी गेले होते. दुसर्या दिवशी संजय बाजीराव चव्हाण हा कर्मचारी पतपेढीत आला होता. यावेळी त्याला कार्यालयातील सर्व फाईल्स अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. लाकडी टेबलचे दरवाजा उघडे दिसले. त्यात गोदरेज कंपनी एक तिजोरी चोरीस गेल्याचे दिसून आले. पतपेढीच्या खिडकीच्या मागील ग्रीलचे तीन गज कापलेले होते. याच खिडकीतून चोरट्याने आत प्रवेश करुन तिजोरी चोरी केली होती. त्यात १८ लाख ५० हजार रुपयांचे विविध २५ तोळे सोन्याचे दागिने आणि १ लाख १३ हजार रुपयांची कॅश असा १९ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने पळवून नेला होता. हा प्रकार उघडकीस येताच रामचंद्र पवार यांनी पायधुनी पोलिसांना ही माहिती दिली होती.
या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी रामचंद्र पवार यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. पतपेढीसह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे.