मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – कारवाईसाठी गेलेल्या संतोष रावजी राणे या पोलीस हवालदाराच्या हाताला आरोपीने जोरात चावा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र गुन्हे शाखेच्या पथकाने पळून जाणार्या निमेश दिलीप दरेकर याला शिताफीने पकडून समतानगर पोलिसांच्या स्वाधीन केले. निमेश हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध सतराहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
संतोष राणे हे पोलीस हवालदार असून ते सध्या दहिसर युनिट गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. सोमवारी दुपारी पावणेचार वाजता संतोष राणे, बाळकृष्ण लिम्हण हे कांदिवलीतील काजूपाडा, पोईसर, गोविंद भाणा चाळीत कारवाईसाठी गेले होते. या ठिकाणी निमेश राहत असून तो त्याच्या राहत्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक तिथे गेले होते. मात्र साध्या वेशातील पोलिसांना पाहताच निमेश हा पळू लागला. या पथकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने शासकीय कामात अडथळा आणून पोलीस हवालदार संतोष राणे व बाळकृष्ण लिम्हण यांच्या हाताचा चावा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी बळाचा वापर करुन त्याला ताब्यात घेऊन समतानगर पोलीस ठाण्यात आणले. तिथे संतोष राणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी निमेशविरुद्ध १३२, १२१ (१) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. निमेश हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह खंडणी, गंभीर दुखापत करणे, मारामारी, खंडणी, गंभीर दुखापत करणे, अपहरण, लैगिंक अत्याचार अशा सतराहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यातील बहुतांश गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या जामिनावर बाहेर होता. जामिनावर बाहेर असतानाही त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरुच होत्या. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखेचे एक पथक गेले होते असे पोलिसांनी सांगितले.