गोवंडीतील कार अपघातात ३५ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू
मृत व्यक्तीला काही अंतर फरफरत नेल्याने तपासात उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – गोवंडीतील कार अपघातात एका ३५ ते ४० वयोगटातील व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीची ओळख पटली नसून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. मृत व्यक्तीला कारचालकाने काही अंतर फरफरत नेले होते, त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी अपघाताची नोंद करुन कारचालक रिहान निजामुद्दीन कुडाळकर याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
हा अपघात सोमवारी रात्री उशिरा सव्वाच्या सुमारास चेंबूर येथील व्ही. टी पाटील मार्ग, अमर सिनेमागृहाजवळ झाला. संदीप बाबासाहेब जाधव हे गोवंडी पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत आहेत. रविवारी रात्री आठ वाजता ते कर्तव्यावर हजर झाले होते. रात्री उशिरा ते त्यांचे सहकारी पोलीस हवालदार गडदे, पोलीस शिपाई सोळंके यांच्यासोबत परिसरात गस्त घालत होते. यावेळी कंट्रोल रुममधून त्यांना एक कॉल आला होता. त्यात अमर सिनेमागृहाजवळ एक अपघात झाला असून पोलीस मदत हवी आहे असे सांगण्यात आले. त्यामुळे ते त्यांच्या सहकार्यासोबत तिथे गेले होते. तिथे पोलिसांना एक ३५ ते ४० वयोगटातील व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेला दिसून आला. एका स्विफ्ट कारने धडक दिल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला पोलिसांनी तातडीने जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनास्थळाहून पोलिसांनी कारचा चालक रिहान कुडाळकर याला ताब्यात घेतले होते.
चौकशीत तो त्याच्या कुटुंबियांसोबत तिथे जेवणासाठी आला होता. जेवण करुन तो कारमधून जात असताना कारची धडक लागून संबंधित व्यक्ती त्याच्या कारच्या चाकाखाली आली. त्याचा अंदाज न आल्याने त्याने त्याला काही अंतर फरफरत नेले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. हा प्रकार स्थानिक लोकांच्या लक्षात येताच त्यांनी कारचालकाला थांबण्यास सांगून जखमी झालेल्या व्यक्तीला बाजूला केले होते. मृत व्यक्तीची ओळख पटली नसून त्याची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे. याप्रकरणी संदीप जाधव यांच्या तक्रारीवरुन गोवंडी पोलिसांनी कारचालक रिहान कुडाळकर याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दुसर्या दिवशी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तपासात रिहानचा स्वतचा व्यवसाय असून तो त्याच्या कुटुंबियांसोबत मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाऊंड परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.