मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – लोकल प्रवासात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली. राहुल किसन जगधने असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. कांदिवली-बोरिवली रेल्वे स्थानकादरम्यान घडलेल्या या घटनेने महिलांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
तक्रारदार महिला दहिसर येथे तक्रारदार महिला राहते. दोन दिवसांपूर्वी ती कामानिमित्त सांताक्रुजला आली होती. काम संपल्यानंतर तिने घरी जाण्यासाठी लोकल पकडली होती. मालाड रेल्वे स्थानक आल्यानंतर डब्ब्यात एक तरुण आला होता. तो तिच्या समोरील सीटवर बसून तिच्याकडे अश्लील नजरेने पाहत होता. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले, मात्र तो सतत तिच्याकडे पाहत असल्याने तिने तिच्या मुलाला कॉल करुन दहिसर रेल्वे स्थानकात बोलाविले होते. ही लोकल कांदिवली रेल्वे स्थानकात येताच ती दुसर्या सीटवर जाऊन बसली. त्यानंतर तो तिथे आला आणि त्याने तिच्याश अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तिने तिच्या शेजारी बसलेल्या महिलेची मदत घेतली होती. तोपर्यंत ही लोकल बोरिवली रेल्वे स्थानकात आली होती. याच दरम्यान तो तेथून पळून गेला होता.
दहिसर रेल्वे स्थानक आल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या मुलाला सांगितला. त्यानंतर ते दोघेही बोरिवली रेल्वे स्थानकात आले आणि त्यांनी रेल्वे पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी राहुल जगधने याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच तक्रारदार महिलेचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला अटक करुन पोलिसांनी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती.