मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – वांद्रे येथील सिनेअभिनेता सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटसमोरील घराजवळ झालेला गोळीबार आणि नंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून झालेली हत्येची घटना ताजी असताना आता बिष्णोई टोळीच्या टार्गेटवर एक फॅशन डिझायनर असल्याचे उघडकीस आले आहे. ऑगस्ट महिन्यांत या फॅशन डिझायनरला बिष्णोई टोळीच्या नावाने ५५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी अप्रत्यक्षपणे धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
व्यवसायाने फॅशन डिझायनर असलेले ४२ वर्षीय तक्रारदार त्यांच्या कुटुंबियांसोबत माझगाव डॉक परिसरात राहतात. त्यांचा स्वतचा व्यवसाय आहे. ३० ऑगस्टला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना पहाटे एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. या व्यक्तीने बिष्णोई टोळीचा उल्लेख करुन त्यांच्याकडे ५५ लाखांची मागणी केली होती. त्यांच्या व्यवहारात त्यांना अपूर्वीला ५५ लाख रुपये देणे बाकी आहे. ही रक्कम केव्हा आणि कशी देणार याबाबत विचारणा करुन त्याने त्यांना सात दिवसांची मुदत दिली होती. या सात दिवसांत अपूर्वीला ५५ लाख रुपये दिले नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली होती. हमारे चक्कर मे ना पड, फॅमिलीवाला बंदा है ना, तेरी जान की पर्वा है क्या नही. कल अपूर्वी से बात कर असे बोलून त्याने कॉल बंद केला होता. सुरुवातीला त्यांना कोणीतरी त्यांची मस्करी करत असल्याचे वाटले. मात्र अज्ञात व्यक्तीने बिष्णोई टोळीचा उल्लेख केला होता. त्यामुळे ते प्रचंड घाबरले होते.
गेल्या काही दिवसांत बिष्णोई टोळीविषयी काही बातम्या त्यांच्या वाचण्यात आले होते. सलमान खान याच्यावर झालेला गोळीबार आणि नंतर बाबा सिद्धीकी यांच्या हत्येत बिष्णोई टोळीच असल्याचे प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे त्यांनी ही माहिती त्याच्या कुटुंबियासह नातेवाईक आणि परिचित मित्रांना सांगितली होती. त्यांनी त्यांना या धमक्यांना हलक्यात न घेता पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ते सोमवारी शिवडी पोलीस ठाण्यात गेले आणि तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. यावेळी त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अप्रत्यक्षपणे ५५ लाखांच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आल्याचा आरोप त्यांच्या तक्रार अर्जात केला होता. या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास शिवडी पोलिसांसह गुन्हे शाखेला करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या आदेशानंतर पोलिसांनी संमातर तपास सुरु केला आहे. ज्या मोबाईल क्रमांकावरुन ही धमकी देण्यात आली होती. त्या मोबाईल क्रमांकाची सीडीआर काढली जात आहे. लवकरच धमकी देणार्या अज्ञात व्यक्तीला अटक केली जाईल. या धमकीमागे नक्की बिष्णोई टोळीचा सहभाग आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.