प्रोजेक्टसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसणुक
२.४० कोटीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत पिता-पूत्राला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – खार येथील गोदावरी इमारतीच्या पुर्नविकास प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन परभणीच्या एका बिल्डरची फसवणुक केल्याप्रकरणी पळून गेलेल्या पिता-पूत्र बिल्डरला खार पोलिसांनी अटक केली. दिलनवाज इद्रीस खान आणि मोहम्मद इद्रीस खान अशी या दोघांची नावे असून ते दोघेही यशश्री कन्स्ट्रक्शनचे मालक आहेत. या दोघांनी प्रोजेक्टसाठी घेतलेल्या २ कोटी ४० लाखांचा अपहार केल्याचा आरोप आहे. पोलीस कोठडीनंतर या दोघांना रविवारी वांद्रे येथील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी सांगितले.
परभणीचे रहिवाशी असलेले ऐराज इफ्तेखारोद्दीन सिद्धीकी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची स्कायलाईन बिल्डींग व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी असून ही कंपनी कॉन्ट्रक्ट घेऊन इमारतीचे बांधकाम करते. त्यांच्याकडे शकील अहमदअली शेख हा मॅनेजर म्हणून कामाला आहे. त्याने त्यांची ओळख यशश्री कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक मोहम्मद इद्रीस आणि दिलनवाज यांच्याशी करुन दिली होती. त्यांची कंपनी बांधकाम क्षेत्राशी संबंधित असून त्यांच्याकडे अनेक पुर्नविकास इमारतीचे काम आले आहे. खार येथील गोदावरील इमारतीच्या पुर्नविकासाचे काम त्यांच्या कंपनीकडे असून आर्थिक कारणामुळे त्यांच्या इमारतीचे बांधकाम अर्धवट थांबले आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुक करावी, त्यामोबल्यात त्यांना गोदावरी इमारतीमध्ये सहा फ्लॅट देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. हा प्रस्ताव चांगला वाटल्याने त्यांनी त्यांची खार येथील कार्यालयात भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी त्यांच्या प्रोजेक्टची सविस्तर माहिती सांगितली. सात मजली इमारतीचा हा प्रोजेक्ट होता. महानगरपालिकेला प्रिमियम भरण्यासह इतर परवानग्यासाठी त्यांना तीन कोटीची गरज आहे असे सांगून त्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.
ठरल्याप्रमाणे त्यांच्यात एक करार झाला होता. गुंतवणुकीच्या मोबदल्यात त्यांना सहा फ्लॅट देण्याचे दिलनवाज आणि मोहम्मद इद्रीस यांनी मान्य केले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यात मार्च ते जुलै २०२३ या कालावधीत टप्याटप्याने २ कोटी ४० लाख ५३ हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. यावेळी त्यांनी मनपा प्रिमियमसह इतर परवानग्या मिळाल्याचे दस्तावेज दाखविले होते. मात्र ऑक्टोंबर २०२३ पर्यंत त्यांनी इमारतीचे तीन मजले बांधकाम पूर्ण केले होते. नंतर त्यांनी बांधकाम बंद केले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी मनपामध्ये चौकशी केली असता त्यांनी दिलेले सर्व दस्तावेज बोगस होते. त्यांनी मनपाला प्रिमियमची रक्कम भरली नव्हती तसेच परवानगी घेण्यासाठी दिलेले पैसेही जमा केले नव्हते. याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न केला होता. गुंतवणुकीच्या नावाने पैसे घेऊन या पैशांचा इमारत बांधकामासाठी वापर न करता वैयक्तिक फायद्यासाठी वापर करुन त्यांची फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी दिलवाज खान आणि मोहम्मद इद्रीस खान यांच्याविरुद्ध ऑगस्ट २०२४ रोजी तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी १२० बी, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या दोघांचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या पथकाने तीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या दिलनवाज खान आणि मोहम्मद इद्रीस या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यांनी फसवणुकीच्या उद्देशाने त्यांनी तक्रारदारांना त्यांच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केल्याची कबुली दिली आहे.