गाळा-फ्लॅटसाठी दिड कोटीचा अपहार करुन फसवणुक

अनिवासी भारतीयाची फसवणुक करणार्‍या पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ नोव्हेंबर २०२४
मुंबई, दि. १२ (प्रतिनिधी) – आधी व्यावसायिक गाळ्यासाठी एक कोटी सहा लाख आणि नंतर फ्लॅटसाठी पन्नास लाख असे १ कोटी ५६ लाख रुपयांचा अपहार करुन एका वयोवृद्ध अनिवासी भारतीयाची फसवणुक झाल्याचा प्रकार खार परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका पती-पत्नीविरुद्ध खार पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. निरव शहा आणि मोनिका निरव शहा अशी या दोघांची नाव असून ते दोघेही पार्थष डेव्हल्पर्सचे संचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांनी अशाच प्रकारे इतरांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले असून या गुन्ह्यांचा पोलिसाकडून तपास सुरु आहे.

रमेश आसनदास मघनानी हे ६१ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार अनिवासी भारतीय असून टांझानिया देशाचे नागरिक आहेत. टांझानियाच्या बोरा इंडस्ट्रिज कंपनीत ते कामाला होते. २१ वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले होते. त्यानंतर ते भारतात परत आले होते. त्यांचा अंधेरीतील म्हाडा, टेलिफोन एक्सचेंजजवळ एक फ्लॅट असून तिथे ते सध्या वास्तव्यास आहेत. त्यांना प्रॉपटीमध्ये गुंतवणुक करायची होती. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. चौदा वर्षांपूर्वी त्यांच्या एका मित्राने त्यांना निरव शहा याच्याबाबत माहिती दिली होती. निरव हा बिल्डर असून त्याचे सांताक्रुज येथे यांत्रिक नावाच्या एका इमारतीचे प्रोजेक्ट सुरु आहे. त्यात गुंतवणुक केल्यास त्यांना भविष्यात चांगला फायदा होईल असे सांगितले. त्यामुळे ते टांझानिया येथून मुंबईत आले होते. याच दरम्यान त्यांनी निरव, त्याची पत्नी मोनिका आणि किशोर लेहरानी यांची त्यांच्या खार येथील कार्यालयात भेट घेतली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रोजेक्टची माहिती सांगून त्यांना एक कोटी सहा लाखांमध्ये ७६८ चौ. फुटाचा व्यावसायिक गाळा देण्याचे आश्‍वासन देताना इमारतीचे बांधकाम पूर्ण करुन गाळ्याचा ताबा २०१३ मध्ये देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर त्यांच्यात एक करार झाला होता.

या करारानंतर त्यांनी शहा यांच्या कंपनीच्या बँक खात्यात एप्रिल ते ऑक्टोंबर २०१० या कालावधीत टप्याटप्याने १ कोटी ६९ हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यानंतर ते पुन्हा टाझांनिया येथे गेले होते. दोन वर्षांनंतर त्यांनी गाळ्याविषयी विचारणा केल्यानंतर शहाचा प्रोजेक्ट आर्थिक कारणामुळे प्रलंबित असून त्याला प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. त्यातच त्याचा एक दुसरा प्रोजेक्ट सुरु आहे. त्यातही त्याचे पैसे अडकले असल्याचे समजले होते. २०१३ साली ते पुन्हा मुंबईत आले आणि त्यांनी निरवची भेट घेतली होती. यावेळी त्याने तांत्रिक कारणामुळे त्याचा प्रोजेक्ट रखडला असून लवकरच बांधकाम सुरु करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्याने त्यांना त्याच्या दुसर्‍या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट घेण्यास प्रवृत्त केले होते. त्यांना स्वस्तात फ्लॅट देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी त्याच्या गंगा-जमुना या निवासी इमारतीच्या प्रोजेक्टमध्ये ९३० स्न्वेअर फुटाचा थ्री बीएचकेचा एक फ्लॅट बुक केला होता. यावेळी त्यांनी व्यावसायिक गाळ्याचा व्यवहार रद्द करुन फ्लॅटसाठी त्याला आणखीन एक कोटी देण्याचे मान्य केले होते.

ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याला ५० लाख रुपये दिले होते. या इमारतीमधील सात फ्लॅट तारण ठेवून निरव शहाने एका खाजगी बँकेत वीस कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यात रमेश मघनानी यांच्यसह इतर सहा फ्लॅटधारकांचा समावेश होता. त्यामुळे त्यांच्या फ्लॅट रजिस्ट्रेशन झाले नव्हते. बँकेचे कर्ज फेडून नंतर त्यांच्या फ्लॅटचे रजिस्ट्रेशनने होईल असेही निरवने सांगितले होते. मात्र चौदा वर्ष उलटूनही त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही. किंवा फ्लॅटसाठी घेतलेले पैसेही परत केले नाही. अशा प्रकारे आधी व्यावसायिक गाळ्यासाठी एक कोटी सहा लाख आणि नंतर फ्लॅटसाठी पन्नास लाख असे १ कोटी ५६ लाख रुपये घेऊन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी या पती-पत्नीविरुद्ध खार पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर निरव आणि मोनिका शहा यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही फ्लॅटधारकाची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून दोन्ही आरोपींना लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page