दागिने खरेदीच्या नावाने ज्वेलर्स व्यापारी मित्राची फसवणुक
दोन महिन्यांपासून फरार असलेल्या मित्राला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – मामासाठी दागिने खरेदी करायचे असे सांगून साडेतीन लाखांचे दागिने घेऊन पळून गेलेल्या जय हितेश शाह या आरोपीस बोरिवली पोलिसांनी अटक केली. जय हा तक्रारदार ज्वेलर्स व्यापार्याचा जवळचा मित्र असून फसवणुकीनंतर तो पळून गेला होता. अखेर दोन महिन्यानंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
वैभव जनक सोनी हे बोरिवली परिसरात राहत असून ज्वेलर्स व्यापारी आहे. त्यांचा त्यांच्या आतेभावासोबत बोरिवली परिसरात सोने विक्रीचा एक शॉप आहे. जय शाह हा त्यांचा मित्र असून गेल्या दहा वर्षांपासून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. अनेकदा जयने त्यांच्या शॉपमधून दागिने घेतले होते, या दागिन्यांचे पेमेंट वेळेवर केल्याने त्यांचा त्याच्यावर विश्वास होता. १९ एप्रिलला तो त्यांच्या शॉपमध्ये आला होता. त्याच्या मामासाठी त्याला सोन्याची चैन आणि अंगठी घ्यायची होती. त्यामुळे त्यांनी त्याला साडेतीन लाखांची एक चैन आणि हिर्यांची अंगठी दिली होती. दोन तासांत दागिने दाखवून परत घेऊन येतो असे सांगून जय हा निघून गेला. मात्र बराच वेळ होऊन तो परत आला नाही. त्याला कॉल केल्यानंतर तो त्यांना प्रतिसाद देत नव्हता. नंतर त्याने त्यांचे फोन घेणे बंद केले होते.
दागिने खरेदीच्या नावाने जय हा साडेतीन लाखांचे दागिने घेऊन पळून गेल्याची खात्री होताच त्यांनी त्याच्याविरुद्ध बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर जयविरुद्ध पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन त्याच्याच ज्वेलर्स व्यापारी मित्राची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत तो गेल्या दोन महिन्यांपासून फरार होता. अखेर त्याला बोरिवली परिसरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.