मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत अटकेची धमकी देऊन फसवणुक

सिके्रट बँक खात्यात ट्रान्स्फर केलेल्या १.२० कोटीचा अपहार

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत अटक करण्याची धमकी देऊन एका ऐंशी वर्षांच्या वयोवृद्धाला सिक्रेट बँक खात्यात एक कोटी वीस लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करुन त्यांची फसवणुक झाल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंगलोर पोलिसांसह सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करणार्‍या अज्ञात सायबर ठगाविरुद्ध सायबर सेल पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोंबर या कालावधीत बंगलोर पोलिसांसह ईडी, आयकर, सीबीआय, सर्वोच्च न्यायालयाचे विविध दस्तावेज पाठवून तक्रारदाराच्या मनात भीती निर्माण करुन ही फसवणुक झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

८० वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार हरिशकुमार जयगोपाल अरोरा हे वांद्रे येथे राहत असून ते मरिन इंजिनिअर कंपनीतून निवृत्त झाले आहेत. ३० सप्टेंबरला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना संदीप राव नावाच्या एका व्यक्तीने कॉल करुन तो बंगलोर पोलीस विभागातून बोलत असल्याचे सांगितले. त्याने त्यांच्याविरुद्ध मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्याचे सांगितला. काही वेळानंतर त्याने त्यांना व्हिडीओ कॉल केला होता. यावेळी त्यांना समोर एक पोलीस गणवेशात घातलेला अधिकारी दिसून आला. मात्र काही बोलण्यापूर्वीच त्याने फोन कट केला. त्यामुळे त्यांना तो पोलीस अधिकारी असल्याची खात्री झाली होती. त्याने त्यांना घरातील सर्व खिडक्या, दरवाजा बंद करण्यास सांगितले. त्यांच्या नावाने एका बँकेत खाते उघडण्यात आले असून त्यात तीन दिवसांत दोन कोटी रुपये जमा झाले आहेत. हा मनी लॉड्रिंगचा प्रकार असून त्यात त्यांना किती पैसे मिळाले याबाबत विचारणा सुरु केली. यावेळी त्यांनी संबंधित बँक खात्यासह दोन कोटीशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. त्याने त्यांना तुम्ही वयोवृद्ध असल्याने पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलाविणार नाही. तुम्ही प्रामाणिक दिसतात, त्यामुळे त्याच्याकडून त्यांना मदत होईल असे सांगून त्यांचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.

सुरुवातीला जोरजोरात धमकावून भीती निर्माण करणारा हाच अधिकारी नंतर त्यांना मदत करणार असल्याचे सांगत होता. त्यामुळे त्यांनी त्याला मदत करण्याची तयारी दर्शविली होती. काही वेळानंतर त्याने त्यांना ड्राफ्ट तयार करण्यास सांगून या केसबाबत ते कोणालाही काहीही सांगणार नाही असे लिहून देण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी तसा ड्राफ्ट तयार केला. यावेळी त्याने त्याच्याविरुद्घ गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी आता सीबीआय अधिकारी करणार आहे असे सांगितले. त्यानंतर त्यांना आकाश कुलहारी नाव सांगणार्‍या सीबीआय अधिकार्‍याने कॉल केला होता. त्यांच्याविरुद्ध नोटीस जारी करण्यात आली असून त्यांना मुंबईसह महाराष्ट्राबाहेर कुठेही जाता येणार नाही. जायचे असेल तर सीबीआयची परवानगी घ्यावी लागेल. यानंतर त्याने त्यांना सीबीआय, ईडी आणि सर्वोच्च न्यायालयाने काही दस्तावेज पाठविले होते. त्यामुळे ते प्रचंड घाबरले होते. ३ ऑक्टोंबरला त्यांना आकाशने पुन्हा कॉल करुन त्यांच्या बँक खात्यातील सर्व कॅश त्यांच्या सिक्रेट बँक खात्यात पाठविण्यास सांगितले. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम पुन्हा ट्रान्स्फर होईल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी कुठलीही शहानिशा करता त्यांच्या बँक खात्यातील एक कोटी वीस लाख रुपये संबंधित सिक्रेट बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम पाठविल्यानंतर त्यांना आयकर विभागाचे एक पत्र पाठविण्त आले होते.

याच दरम्यान त्यांना त्यांच्या एका मित्राने अशाच प्रकारे फसवणुकीच्या बातमीचा एक व्हिडीओ पाठविला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांना त्यांची फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधिताविरुद्ध २०४, २०५, ३१८ (४), ३१९ (२), ३३६ (२), ३३६ (३), ३४० (२), ६१ भारतीय न्याय सहिता सहकलम ६६ (सी), ६६ (डी) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु आहे. ज्या सिक्रेट बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्याची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मनी लॉड्रिंगसह इतर धमक्या देऊन पैशांची मागणी करणार्‍या ठगापासून लोकांनी सावध राहावे, त्यांच्याशी आपल्या बँक खात्याची कुठलीही माहिती शेअर करु नये. असा कॉल आल्यास त्वरीत जवळच्या पोलीस ठाण्यांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page