मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – नवीन क्रेडिट कार्ड ऍक्टिव्ह करण्याची बतावणी करुन मोबाईल हॅक करुन एका महिलेची अज्ञात सायबर ठगाने सुमारे दहा लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याचा प्रकार कुलाबा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून कुलाबा पोलिसांनी या ठगांचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेल पोलिसांकडून संमातर तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.
५६ वर्षांची तक्रारदार महिला माला पुरण दोषी ही कुलाबा येथे राहते. तिच्या पतीचा कुलाबा येथे मुंबई ज्वेलर्स नावाचे सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. २१ ऑक्टोंबरला ती तिच्या घरी होती. यावेळी तिच्या घरी पोस्टाने तिच्या बँकेचे एक क्रेडिट कार्ड आले होते. मात्र तिने ते पॅकेट उघडले नव्हते. काही दिवसांनी तिला बँकेने तीस दिवसांत क्रेडिट ऍक्टिव्ह करण्यास सांगितले होते. याच दरम्यान तिला एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो तिच्या बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्याने तिचे क्रेडिट कार्ड ऍक्टिव्ह करण्यास सांगितले. त्यामुळे तो सांगत असलेले स्टेप तिने पूर्ण केले होते. त्याने तिला क्रमांकावर कॉल करण्यास सांगितले, मात्र कॉल करुनही समोरुन कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तिला बँकेतून कॉल आला नाही. मात्र २२ ऑक्टोंबरला तिला बँकेतून काही मॅसेज प्राप्त झाले होते. त्यात काही ओटीपी क्रमांक होते.
हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने तिच्या पतीसोबत बँकेत जाऊन तक्रार केली होती. यावेळी तिने तिचे नवीन क्रेडिट कार्ड ब्लॉक केले होते. यावेळी बँकेने तिच्या क्रेडिट कार्डवरुन दहा लाख रुपयांचे दोन ऑनलाईन व्यवहार झाल्याचे सांगितले. त्यामुळे तिने तिचा मोबाईल एका मोबाईल शॉपमधील टेक्निशियनकडे दिला होता. त्याने मोबाईलची तपासणी केल्यानंतर तिच्या मोबाईलमधील सर्व कॉल दुसर्या मोबाईल क्रमांकावर जात असल्याचे सांगितले. बँकेचा कर्मचारी असल्याची बतावणी करुन अज्ञात व्यक्तीने तिला क्रेडिट कार्ड ऍक्टिव्ह करण्यास प्रवृत्त करुन तिला एका क्रमांकावर कॉल करण्यास प्रवृत्त केले होते. त्यानंतर त्याने तिचा मोबाईल हॅक करुन मोबाईलमधील माहिती काढून ही फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच तिने ऑनलाईन सायबर हेल्पलाईनसह दक्षिण प्रादेशिक सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. यावेळी त्यांनी तिला स्थानिक पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने घडलेला प्रकार कुलाबा पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा कुलाबा पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.