हुंड्यासाठी छळ करुन ऑडिओ कॉलद्वारे तिहेरी तलाक
उत्तरप्रदेशच्या एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – लग्नाच्या दुसर्याच दिवशी हुंड्यावरुन नवविवाहीतेला टोमणे मारुन तिचा मानसिक व शारीरिक शोषण करुन ऑडिओ कॉलद्वारे तिच्या पतीने तिला तिहेरी तलाक देऊन घटस्फोट घेतल्याची घटना गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात उघडकीस आली आहे. लग्नाच्या नऊ महिन्यांत पतीने हुंड्यासाठी पत्नीला घटस्फोट दिल्याने उत्तरप्रदेशातील एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लाडली मेहफुस शेख, महेफुज शेख, सुंबुल तारीख खान आणि फैसल शेख अशी या चौघांची नावे असून या चौघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
३१ वर्षांची तक्रारदार महिला ही गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात राहते. तीन वर्षांपूर्वी तिला तिच्या नातेवाईकाकडून फैसल शेख याचे लग्नासाठी स्थळ आले होते. फैसल हा कतार येथे नोकरी करत होता. त्याचे कुटुंबिय चांगले वाटल्याने तिच्या कुटुंबियांनी या लग्नाला संमती दर्शविली होती. त्यानंतर २२ नोव्हेंबर २०२३ रोजी तिचे फैसलसोबत उत्तरप्रदेशातील महुल, घोसी गावात दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने लग्न झाले होते. लग्नापूर्वी तिच्या आईने त्यांना दिड लाख रुपये हुंडा म्हणून दिला होता. त्यानंतर लग्नात त्यांनी तिला गृहपयोगी वस्तूसह स्त्रीधन दिले होते. लग्नाचा सर्व खर्च तिच्या आईनेच केला होता. लग्नानंतर ती उत्तरप्रदेशातील फैसलच्या गावी राहत होती. मात्र लग्नाच्या दुसर्या दिवशी तिच्या सासरच्या मंडळीने हुंड्यावरुन तिला टोमणे मारणे सुरु केले होते. एक महिन्यानंतर तिच्या पतीने त्यांना खर्चासाठी पैसे लागतील, त्यामुळे तिने घरखर्चासाठी माहेरहून पैसे आणावेत असे सांगितले. त्यामुळे तिने तिच्या नातेवाईकाकडून पैसे आणून फैसलला दिले होते. तरीही तिची सासू लाडलीख नणंद सुंबुल, सासरे मेहफुज हे तिघेही लग्नात सामान चांगले दिले नाही. बाईक दिली नाही. हुंडा कमी दिला. माहेरुन फ्लॅटसाठी दहा लाख रुपये आणले नाही म्हणून तिचा मानसिक व शारीरीक शोषण करत होते.
मार्च २०२४ रोजी फैसलला पुन्हा नोकरीसाठी कतारला जायचे होते. त्यामुळे त्याने विमान तिकिटासाठी तिच्याकडे पुन्हा पैशांची मागणी सुरु केली होती. तिने माहेरुन पैसे आणण्यास नकार दिला नाही. त्यामुळे त्याने तिला घटस्फोटाची धमकी दिली होती. त्यामुळे तिने तिच्या आईकडून पैसे आणून त्याला दिले होते. त्यानंतर फैसल हा कतारला निघून गेला. एप्रिल २०२४ रोजी त्याने तिला फोन केा होता. लग्नात प्रचंड खर्च झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर कर्ज झाले असून कर्जाच्या परतफेडीसाठी त्याच्याकडे लोक पैशांची मागणी करत आहेत. त्यामुळे तिने सोन्याचे दागिने विकून त्यातून आलेले पैसे तिच्या सासर्याला देण्यास सांगितले. पैसे दिले नाहीतर त्याने तिला पुन्हा घटस्फोटाची धमकी दिली होती. पैशांवरुन तिच्या पतीसह सासरच्या मंडळीकडून तिचा सतत मानसिक व शारीरिक शोषण सुरु होता. अनेकदा ते तिला मारहाण करत होते. ऑगस्ट महिन्यांत तिच्या सासूसह नणंदने तिला मारहाण करुन तिचे सर्व दागिने घेऊन घरातून बाहेर काढले होते. त्यानंतर ती तिच्या गोवंडीतील राहत्या घरी निघून आली होती.
माहेरी आल्यानंतर ५ ऑगस्ट २०२४ रोजी तिच्या पतीने तिला ऑडिओ कॉल करुन तिच्याशी त्याला काहीही संबंध ठेवायाचे नाही. आजपासून त्यांच्यातील संबंध संपले. तू माझ्यासाठी हराम आहे, त्यामुळे ती तुला आताच घटस्फोट देतो असे सांगून तिला तीन वेळा तलाक बोलून घटस्फोट दिला होता. लग्नाच्या नऊ महिन्यांत पतीसह सासरच्या मंडळीकडून हुंड्यासाठी झालेला मानसिक व शारीरिक शोषण आणि त्यातच पतीने दिलेल्या घटस्फोटामुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती. अखेर तिने पतीसह इतरांविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिने त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तिच्या पतीसह सासू-सासरे आणि नणंद अशा चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत चारही आरोपींना लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे.