गोवंडी-मालाड येथे दोन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार
दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद; एकाला अटक तर दुसर्याचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – गोवंडी आणि मालाड परिसरात पाच आणि पंधरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर आणि कुरार पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत एका आरोपीस कुरार पोलिसांनी अटक केली तर दुसर्या आरोपीचा शिवाजीनगर पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पाच वर्षांची बळीत मुलगी ही मालाड परिसरात राहते. शनिवारी रात्री तिच्याच शेजारी राहणार्या आरोपीने तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून त्याच्या घरी आणले. त्यानंतर त्याने तिचे कपडे काढून तिच्याशी अश्लील चाळे केले. त्यानंतर तिच्या गुप्त भागावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार सोमवारी या मुलीकडून तिच्या आईला समजताच तिने आरोपीविरुद्ध कुरार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला मंगळवारी दुपारी दिडोंशीतील पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
गोवंडीतील दुसर्या घटनेत अल्पवयीन मुलीशी लग्न करुन तिच्यावर तिच्याच पतीने लैगिंक अत्याचार केला. तिला पंधरा आठवड्याची गरोदर राहण्यास भाग पाडले. हा प्रकार उघडकीस येताच आरोपी पतीविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पती पळून गेल्याने त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. पिडीत मुलगी ऍण्टॉप हिल परिसरात राहत असून आरोपीने अल्पवयीन असल्याची माहिती असताना तिच्याशी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यांत लग्न केले होते. त्यानंतर त्याच्या राहत्या घरी तिच्यावर अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता. या गुन्ह्यांचा तपास वडाळा टी टी पोलिसाकडे वर्ग करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.