मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेला तिसरा मुख्य शूटर शिवकुमार गौतम ऊर्फ शिवा बालकिशन गौतम याने तपास अधिकार्यांवर गंभीर आरोप करताना पोलिसांकडून त्याची जबरदस्तीने कबुलीजबाब नोंदविला जात असल्याचा आरोप केला आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर शिवकुमारसह त्याच्या चार सहकार्यांना मंगळवारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र या आरोपानंतरही शिवकुमारच्या पोलीस कोठडीत २३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढविण्यात आली तर त्याच्या चार सहकार्यांना चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. त्यात अनुराग राधेश्याम कश्यप, ज्ञानप्रकाश प्रदीपकुमार त्रिपाठी, आकाश बृजकुमार श्रीवास्तव आणि अखिलेंद्र प्रतापसिंह सुरेशसिंह यांचा समावेश आहे. बाबा सिद्धीकी हत्येतील सर्व आरोपीविरुद्ध लवकरच मोक्का कायद्यांतर्गत कारवाई होणार असून त्याच्या हालचाली पोलिसांकडून सुरु करण्यात आल्याचे बोलले जाते.
१२ ऑक्टोंबरला दसर्याच्या दिवशी वांद्रे येथे बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या करणयात आली होती. या हत्येनंतर दोन शूटरसह इतर आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र हत्येतील तिसरा मुख्य शूटर शिवकुमार गौतम हा पळून गेला होता. गेल्या एक महिन्यांपासून फरार असलेल्या शिवकुमारसह त्याच्या इतर चार सहकार्यांना उत्तरप्रदेशातून पोलिसांनी अटक केली. हत्येनंतर शिवकुमार हा मुंबईतून पुणे, झांखी, लखनऊ आणि बहराईच येथे आला होता. तेथून तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र नेपाळला जाण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली होती. याकामी त्याला इतर चार आरोपींनी मदत केली होती. त्यामुळे या चौघांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. या पाचजणांना नंतर पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्यांना किल्ला न्यायालयाने १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना मंगळवारी पुन्हा किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांच्या वतीने त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. ही मान्य करुन न्यायालयाने शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत २३ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली तर इतर चारही आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे. दरम्यान शिवकुमारच्या चौकशीतनू अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे. या माहितीवरुन आरोपीविरुद्ध जास्तीत जास्त पुरावे जमा करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. दुसरीकडे शिवकुमार गौतमने मंगळवारी किल्ला कोर्टात तपास अधिकार्यांवर गंभीर आरोप करताना त्याच्याकडून जबदस्तीने कबुलीजबाब नोंदवून घेतला जात असल्याचे सांगितले.
आपल्यावर दबाव आणला जात असून आपण सध्या प्रचंड भयभीत आहोत. या खटल्यात पोलिसांकडून मोक्का लावला जाऊ शकतो. मोक्का किंवा अन्य कोणत्याही लागू कायद्याच्या कबुलीजबाब देण्यास आपण इच्छुक नसल्याचे कोर्टात सांगितले. आरोपींना मोक्का कायद्याच्या कलम अठरा अंतर्गत जबदस्तीने, अवाजबी प्रभाव किला कबुलीजबाब देण्यासाठी दबाव येतो असा आरोपच त्याने केला होता. मात्र मुंबई पोलिसांनी शिवकुमारचे आरोप फेटाळून लावले. तो तपासात सहकार्य करत नाही. त्याने गुन्ह्यांत वापरलेली पिस्तूल अद्याप सापडली नाही. त्यामुळे त्याची चौकशी गरजेचे आहे असे सांगून त्याच्या आणखीन पोलीस कोठडीची मागणी केली होती. अखेर ही मागणी मान्य करुन शिवकुमारच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली.