कुरिअरचा बहाणा करुन वयोवृद्ध जोडप्यावर हल्ला करुन लुटमार
एका आरोपीस अटक तर पळून गेलेल्या दुसर्याचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – कुरिअर देण्याचा बहाणा करुन फ्लॅटमध्ये प्रवेश करुन दोन अज्ञात व्यक्तींनी वयोवृद्ध जोडप्यावर हल्ला करुन सोनसाखळी चोरी करुन पलायन केल्याची घटना कुर्ला परिसरात उघडकीस आली आहे. पळून गेलेल्या बिपीन चंद्र बिस्ट या ३२ वर्षांच्या एका आरोपीस कुर्ला पोलिसांनी अटक केली तर त्याचा दुसरा सहकारी मिथुन याचा पोलीस शोध घेत आहेत. मंगळवारी दुपारी एका निवासी इमारतीमध्ये घडलेल्या या लुटमारीच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
ही घटना मंगळवारी २६ नोव्हेंबरला दुपारी अडीच वाजता कुर्ला येथील न्यू मिल रोड, दिवाली दर्शन इमारतीमध्ये घडली. याच इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ५११ मध्ये बस्तिमल धनरुपजी मुनोत हे ७८ वर्षांचे वयोवृद्ध त्यांच्या पत्नी उगमजी (७४) हिच्यासोबत राहतात. त्यांना पाच मुले असून या सर्वांचे लग्न झाले आहेत. त्यांची एक मुलगी मालाड, दोन मुली पुणे, एक मुलगा टिळकनगर तर दुसरा डॉक्टर मुलगा माहीम परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. दुपारी साडेबारा वाजता त्यांची पत्नी एका धार्मिक कार्यक्रमाला गेली होती. दुपारी अडीच वाजता ती घरी आली, यावेळी तिच्या मागून दोन तरुण आले. या दोघांनी कुरिअर पार्सल देण्याचा बहाणा करुन घरात प्रवेश केला. घरात दोघेही वयोवृद्ध जोडपे असल्याचे समजताच त्यांनी चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी एकाने बस्तिमल मुनोज यांच्या गळ्यावर चाकू लावून त्यांच्याकडे पैशांसह दागिन्यांची मागणी केली होती. यावेळी त्यांनी प्रसंगावधान दाखवून आरडाओरड सुरु केली, त्यांच्या आवाजामुळे तिथे लोक जमा झाले होते.
याच दरम्यान त्यांनी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करुन पलायन केले. पळून जाणार्या एकाला स्थानिक रहिवाशांनी पकडले तर त्याचा दुसरा सहकारी पळून जाण्यात यशस्वी झाला होता. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती मिळताच कुर्ला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी रहिवाशांनी पकडून ठेवलेल्या बिपीन बिस्टला पोलिसांनी ताब्यात घेतले. तो दादरच्या फुल मार्केट परिसरात राहत असून त्याच्या चौकशीतून त्याचा दुसरा सहकारी मिथुन असल्याचे उघडकीस आले. आरोपींच्या हल्ल्यात बस्तिमल आणि उगमजी यांना दुखापत झाल्याने त्यांना भाभा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर ते दोघेही पोलीस ठाण्यात आले. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्घ गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर बिपीन बिस्टला पोलिसांनी अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. मिथुन पळून गेल्याने त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.