दरोड्यासाठी आलेल्या त्रिकुटाला घातक शस्त्रांसह अटक
दिडोंशी पोलिसांची कारवाई; पळालेल्या तिघांचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – दरोड्यासाठी आलेल्या एका त्रिकुटाला दिडोंशी पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. अब्दुल रफिक अब्दुल हमीद अन्सारी ऊर्फ अप्पू खोटे, अक्षय परशुराम कोतेकर आणि शोएब इमाम खान अशी या तिघांची नावे असून ते तिघेही गोरेगावच्या संतोषनगर, बीएमसी कॉलनीतील रहिवाशी आहे. तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर बोरिवलीतील लोकल कोर्टाने तिघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईदरम्यान त्यांचे तीन सहकारी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
गोरेगाव येथील मोहन गोखले रोड, साईबाबा कॉम्प्लेक्स, ओम सुपर मार्केट परिसरात काही रेकॉर्डवरील गुन्हेगार दरोड्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती दिडोंशी पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. मंगळवारी रात्री उशिरा तिथे सहाजण आले होते, या सर्वांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी शरण येण्यास सांगितले, मात्र साध्या वेशातील पोलिसांना पाहताच ते सर्वजण पळू लागले. यावेळी पळून जाणार्या अब्दुल रफिक अन्सारी, अक्षय कोतेकर आणि शोएब खान या तिघांना पोलिसांनी अटक केली तर त्यांचे तीन सहकारी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले होते. तिन्ही आरोपीकडून पोलिसांनी एक सुरा, टेस्टर, चाकू, नायलॉनची रस्सी, मिरचीची पूड, लोखंडी कटावणी, पक्कड आदी घातक शस्त्रे पोलिसांनी जप्त केले.
चौकशीत ते तिघेही त्यांच्या सहकार्यासोबत ओम सुपर मार्केटमध्ये दरोड्याच्या उद्देशाने आले होते, मात्र दरोड्यापूर्वीच या तिघांनाही घातक शस्त्रांसह पोलिसांनी अटक केली. तिन्ही आरोपी पोलीस अभिलेखावरील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यातील अब्दुल रफिक अन्सारीविरुद्ध बारा, अक्षय कोतेकरविरुद्ध वीस तर शोएब खानविरुद्ध सतरा विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहेत. या तिघांविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर या तिघांनाही बुधवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असून या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.