मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ डिसेंबर २०२४
मुंबई, – गांजा तस्करीप्रकरणी एका २७ वर्षांच्या आरोपीस ऍण्टॉप हिल युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. इम्रान जेहरुल खान असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी साडेनऊ लाखांचा ३८ किलोचा गांजाचा साठा जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला किल्ला कोर्टाने शनिवार ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इम्रान हा गांजा ओरिसा येथून आणून त्याच्या राहत्या घरातून विक्री करत असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक लता सुतार यांनी सांगितले.
जेकब सर्कलजवळील विठ्ठल निवास, बी ब्लॉक, रुम क्रमांक सतरामध्ये इम्रान खान नावाचा एक तरुण राहतो. तो ओरिसा येथून गांजा आणून त्याच्या राहत्य घरातून गांजाच्या छोट्या छोट्या पुड्या बनवून ग्राहकांना विक्री करत असल्याची माहिती पोलीस हवालदार किशोर महाजन यांना मिळाली होती. ही माहिती वरिष्ठांना सांगितल्यानंतर त्याची शहानिशा करण्याचे आदेश युनिटच्या चारच्या अधिकार्यांना देण्यात आले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक लता सुतार, पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शामसुंदर भिसे, सहाय्यक फौजदार संजय परब, पोलीस हवालदार किशोर महाजन, महिला पोलीस हवालदार ज्योती थेटे, पोलीस शिपाई अनुपम जगताप, अनिल पवार, प्रभाकर वाघ, पोपट लाडवले, पोलीस शिपाई चालक किरण चावरेकर यांनी विठ्ठल निवासमधील रुम क्रमांक सतरामध्ये छापा टाकून इम्रान खान याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
त्याच्या घराच्या झडतीत पोलिसांना ३८ किलो ११७ ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा सापडला. त्याची किंमत ९ लाख ५२ हजार ९२५ इतकी आहे. हा साठा जप्त केल्यानंतर इम्रानविरुद्ध पोलिसांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याच्यावर अटकेची कारवाई केली होती. इम्रान हा ओरिसा येथून हा गांजा आणून त्याची मुंबईत विक्री करत होता. गेल्या एक वर्षांपासून तो गांजा विक्री करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.