२६ लाखांच्या चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल

पळून गेलेल्या दोन नोकरांना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ डिसेंबर २०२४
मुंबई, – सुमारे २६ लाख रुपयांच्या दोन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात मालाड पोलिसांना यश आले आहे. या दोन्ही चोरीच्या गुन्ह्यांत दोन नोकरांना पोलिसांनी अटक केली. बुधो जलाल शेख आणि कालेज अदालत शेख अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. सध्या ते दोघेही न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आलोक जवाहर सागर हे ज्वेलर्स व्यापारी असून कांदिवलीतील महावीरनगर परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. मालाडच्या काचपाडा परिसरात त्यांचा कृष्णा बॅगल्स नावाचा सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. या शॉपमध्ये ४० कारागिर व कर्मचारी कामाला असून त्यात बुधो शेख याचा समावेश होता. तो एप्रिल २०२४ पासून त्यांच्याकडे कारागिर म्हणून काम करत होता. २२ ऑक्टोंबरला तो नेहमीप्रमाणे कामावर आला. त्यानंतर तो कामावर आलाच नाही. संपर्क साधल्यानंतर त्याचा मोबाईल बंद येत होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्याकडील दागिन्यांचे ऑडिट केले होते. यावेळी त्यांना २४ लाख ५० हजार रुपयांचे ३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कास्टिंगचे वेगवेगळ्या आकाराचे २५० पिसेस चोरीस गेल्याचे दिसून आले. बुधो शेख यानेच ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन आलोक सागर यांनी मालाड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी बुधो शेखविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना एक महिन्यानंतर पळून गेलेल्या बुधोला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

दुसर्‍या कारवाईत मालाड पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यांत कालेज शेख या नोकराला अटक केली. डायना दिलीन डिसुझा ही महिला मालाड, मिठचौकी, आर्लेम परिसरात राहते. तिचय माकीची एक खाजगी एजन्सी आहे. तिच्या घरी कालेज हा एक वर्षांपासून घरकाम करत होता. २२ ऑक्टोंबर ते १ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत त्याने त्यांच्या घरातील कपाटातून सोन्याची चैन, एक हिरेजडीत अंगठी असा एक लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. हा प्रकार डायना डिसुझा हिच्या लक्षात येताच तिने मालाड पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच कालेजला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने या चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. अटकेनंतर दोन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page