मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ डिसेंबर २०२४
मुंबई, – मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना डी. बी मार्ग आणि समतानगर पोलिसांनी अटक केली. त्यात एका महिलेचा समावेश आहे. तिन्ही नागरिक मुंबईत नोकरीच्या शोधात होते, याच प्रयत्नात असताना त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पिंकी ऊर्फ शिरीन मणीरज्जन मॉनिर शेख, मोहम्मद रोबिउल मोयाज्जेम हुसैन आलम आणि मोहम्मद रिदोय हुसैन मियॉं अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. बांगलादेशातील गरीबीसह बेरोजगारीला कंटाळून ते तिघेही बांगलादेशातून भारतात पळून आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
गेल्या काही वर्षांत मुंंबई शहरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे वास्तव्यास असल्याने अशा बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना कांदिवलीतील आकुर्ली रोड, संदीप हॉटेल गल्लीजवळ काही बांगलादेशी नागरिक नोकरीच्या शोधात फिरत असल्याची माहिती समतानगर पोलिसंाना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी एटीएसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू चौधरी, पोलीस शिपाई पवार, शिंदे, सुपेकर यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. शुक्रवारी दुपारी तिथे पोलिसांना दोनजण संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आले. त्यामुळे या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान या दोघांनी ते बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती दिली. या दोघांकडून पोलिसांनी दोन मोबाईल जप्त केले आहे. या मोबाईलची पाहणी केल्यानंतर ते दोघेही त्यांच्या बांगलादेशातील कुटुंबियांसह नातेवाईक मित्रांच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले आहे. बांगलादेशातील बेरोजगारी आणि गरीबीला कंटाळून ते दोघेही काही महिन्यांपूर्वीच भारतात पळून आले होते. सध्या ते फुटपाथवर मिळेल तिथे झोपत होते. नोकरी नसल्याने ते दोघेही नोकरीच्या शोधात दिवसभरत फिरत होते. कांदिवली परिसरात ते दोघेही नोकरीसाठी आले, मात्र त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी अटक केली.
अन्य एका घटनेत डी. बी मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंकज शेवाळे, पोलीस शिपाई कापसे, महिला पोलीस शिपाई घाडगे, एल. टी मार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक् प्रशांत कांबळे, पोलीस शिपाई शिंदे यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत पिंकी ऊर्फ शिरीन शेख या ३६ वर्षांच्या महिलेस ताब्यात घेतले होते. पिंकी ही ग्रॅटरोड, मोहम्मद शॉ अली रोड, एल. टी मार्केट परिसरात संशयास्पद फिरत होती. ताब्यात घेतल्यानंतर तिने ती बांगलादेशी नागरिक असल्याचे सांगितले. नोकरीच्या शोधात ती बांगलादेशातून भारतात पळून आली होती. तिच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल, सिमकार्ड जप्त केला आहे. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती.