पूर्ववैमस्नातून ३६ वर्षांच्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत आरोपीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ डिसेंबर २०२४
मुंबई, – पूर्ववैमस्नातून झालेल्या वादातून सतीश यलाप्पा कुंचीकुर्वे या ३६ वर्षांच्या व्यक्तीवर त्याच्याच परिचित आरोपीने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना धारावी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी धारावी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अजय गंगाराम केंगर या २६ वर्षांच्या आरोपीस अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना रविवारी सायकाळी साडेसहा वाजता धारावीतील एम. जी रोड, भारत माता जिमसमोरील साईबाबा मंदिर, मुल्लाजी चायवाला परिसरात घडली. व्यकंटेश नरसप्पा पवार हा याच परिसरात राहत असून जखमी सतीश कुंचीकुर्वे हा त्याचा चुलत मावस भाऊ आहेत. सतीश आणि अजय हे एकाच परिसरात राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. आठ दिवसांपूर्वी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर सतीशने अजयने बेदम मारहाण केली होती. त्याचा त्याच्या मनात राग होता. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता ते दोघेही साईबाबा मंदिराजवळील मुल्लाजी चायवाला परिसरात भेटले होते. यावेळी त्यांच्यात आठ दिवसांपूर्वी झालेल्या भांडणावरुन पुन्हा वाद झाला होता. याच वादातून रागाच्या भरात अजयने सतीशवर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता.
या हल्ल्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याच्या कानाला, हाताला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही माहिती मिळताच धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी व्यकंटकेश पवार यांची जबानी नोंदवून पोलिसांनी अजय केंगरविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या अजयला काही तासांत धारावी परिसरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.