मृत अर्भकाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी महिलेस अटक
मिसकॅरेज झाल्याने अर्भकाची विल्हेवाट लावल्याची कबुली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ डिसेंबर २०२४
मुंबई, – गेल्या महिन्यांत नागपाडा परिसरात सापडलेल्या मृत अर्भकाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी एका महिलेस नागपाडा पोलिसांनी अटक केली. मिसकॅरेज झाल्याने योग्य ती काळजी न घेता मृत अर्भक टाकून पलायन केल्याचा तिच्यावर आरोप असून या घटनेमागे काहीही संशयास्पद नसल्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र चौधरी यांनी सांगितले. दरम्यान अटकेनंतर तिला लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
२६ नोव्हेबर २०२४ रोजी नागपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुनिल विजापुरे, पोलीस शिपाई जाधव, मोरे, कफीर आणि महिला पोलीस शिपाई राऊत हे परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांचे सहकारी महिला शिपाई गायकवाड यांनी त्यांना नागपाडा येथील मिर्झा गालीब रोड, भायखळा महिला काराागृहासमोरील फुटपाथवर एक बेवारस अर्भक पडला असल्याची माहिती दिली होती. या माहितीनंतर संबंधित पोलीस पथक तिथे रवाना झाले होते. या पथकाने घटनास्थळाहून एक अर्भकाला ताब्यात घेतले. या अर्भकाला जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे अर्भकाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अर्भकाची योग्य ती काळजी न घेता, अर्भकाची विल्हेवाट लावून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल पोलीस निरीक्षक महेंद्र चौधरी यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता एक महिला अर्भकाला तिथे टाकून पळून गेल्याचे दिसून आले होते.
सीसीटिव्ही फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी एका महिलेस चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत ते अर्भक तिचेच होते. ती तिच्या पतीसह इतर कुटुंबियांसोबत नागपाडा परिसरात राहते. तिचे मिसकॅरेज झाले होते. ही माहिती लपवून तिने अर्भकाची विल्हेवाट लावून पलायन केले होते. तपासात ही माहिती उघडकीस येताच तिला पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर तिला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर तिच्या वतीने तिच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या घटनेमागे काहीही घातपात आणि संशयास्पद नसल्याचे तपास अधिकारी महेंद्र चौधरी यांनी सांगितले.