मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ डिसेंबर २०२४
मुंबई, – जंगलात आणल्यानंतर जिवे मारण्याची धमकी देऊन एका नऊ वर्षांच्या मुलीचे कपडे काढून तिचा तिच्याच परिचित आरोपीने अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मालाडच्या मालवणी परिसरात घडली. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन काही तासांत ५५ वर्षांच्या बिगारी कामगार असलेल्या आरोपीस अटक केली. अटकेनंतर त्याला दिडोशीतील विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी रात्री दहा वाजता घडलेल्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
नऊ वर्षांची ही बळीत मुलगी मालाडच्या मालवणी परिसरात तिच्या पालकांसोबत राहते. आरोपीदेखील याच परिसरात राहत असून तो बिगारी कामगार आहे. ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. शनिवारी रात्री दहा वाजता ती तिच्या मैत्रिणीच्या घरी जात होती. अंबुजवाडी, गेट क्रमांक आठजण आल्यानंतर आरोपीने तिला जवळच असलेल्या जंगलात आणले. आरडाओरड केल्यास त्याने तिला जिवे मारण्याची धमकी देत गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तिचे अंगावरील कपडे काढून त्याने तिच्याशी अश्लील कृत्य करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे सांगून त्याने तिला सोडून दिले होते.
या प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. त्यामुळे घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. ही माहिती ऐकल्यानंतर तिला धक्काच बसला होता. त्यानंतर तिने मालवणी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला मालवणी परिसरातून अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. बळीत मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.