मृत अर्भकाची विल्हेवाट लावून अज्ञात व्यक्तीचे पलायन
सीसीटिव्ही फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ डिसेंबर २०२४
मुंबई, – मृत अर्भकाची विल्हेवाट लावून अज्ञात व्यक्तीने पलायन केल्याची घटना अंधेरीतील वर्सोवा-यारी रोड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी पळून गेलेल्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रविवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. गिरगाव येथे राहणारे प्रकाश सर्जेराव क्षीरसागर हे वर्सोवा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून काम करतात. रविवारी सकाळी सहाय्यक फौजदार सावंत, पोलीस शिपाई प्रकाश क्षीरसागर, वाघमारे आदी अंधेरीतील वर्सोवा परिसरात गस्त घालत होते. यच दरम्यान मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून पोलिसांना एक कॉल प्राप्त झाला होात. हाऊस ऑफ चॅरिटी अव्हर लेडी चर्च परिसरात एक नवजात अर्भक सापडले असून पोलीस मदत हवी आहे असा हा कॉल होता. त्यामुळे या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोलिसांना एक पुरुष जातीचे अर्भक पडल्याचे दिसून आले. या अर्भकाला तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घाषित केले.
या अर्भकाचा जन्म लपविणे, त्याची गुप्तपणे विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने ते अर्भक तिथेच टाकून पलायन केले होते. त्यामुळे पोलीस शिपाई प्रकाश क्षीरसागर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ९४ भारतीय न्याय सहिता कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजच्या मदतीने पोलिसांनी पळून गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे.