मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ डिसेंबर २०२४
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत एका सात वर्षांच्या मुलासह २७ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बोरिवली आणि गोवंडी परिसरात घडली. गणेश राहुल यादव (७) आणि दिक्षीत विनोद राजपूत (२७) अशी या दोन मृतांची नावे आहेत. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग आणि देवनार पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन दोन्ही आरोपी चालकांना अटक केली आहे. या दोन्ही अपघाताच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.
पहिला अपघात शनिवारी सायंकाळी सहा वाजता बोरिवलीतील कार्टर रोड क्रमांक सहाजवळ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सोनू राहुल यादव ही तिच्या पती आणि तीन मुलांसोबत विरारच्या कातरीपाडा, साई चाळीत राहत असून गणेश हा तिचा लहान मुलगा आहे. शनिवारी ती तिच्या बहिणीला भेटण्यासाठी बोरिवलीतील सुकरवाडीत आली होती. दिवसभर तिच्यासोबत राहिल्यानंतर ती सायंकाळी तिच्या घरी जाण्यासाठी निघाली होती. यावेळी तिच्यासोबत तिची मुलगी प्रिती आणि मुलगा गणेश हे दोघेही होते. बहिणीसोबत गप्पा मारत चालत असताना कार्टर रोड क्रमांक सहावर अचानक मागून येणार्या एका स्कॉपिओ कारने गणेशला धडक दिली होती. या अपघातात गणेश हा गंभीररीत्या जखमी झाला होता. जखमी झालेल्या गणेशला तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. सोमवारी सकाळी उपचारादरम्यान गणेशचा मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळताच कस्तुरबा मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सोनू यादव हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कारचालक सुरेंद्र रमाकांत शर्मा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.
दुसरा अपघात गोवंडीतील घाटकोपर-मानखुर्द रोड, म्हाडा कॉलनीजवळील लोटस जंक्शन ते आयओसी सिग्नलदरम्यान झाला. दिक्षीत विनोद राजूत हा २७ वर्षांचा तरुण गोवंडीतील नटवर पारेख कंपाऊंड परिसरात राहत होता. तो सोमय्या कॉलेजमध्ये ऑफिस बॉय म्हणून कामाला होता. शनिवारी सायंाकळी साडेचार वाजता तो कामावरुन घरी आला. रात्री आठ वाजता तो त्याच्या मित्रांसोबत चायनीस पार्टीसाठी गेला होता. मात्र उशिरापर्यंत तो घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या आईने त्याला कॉल केला होता. यावेळी समोरुन बोलणार्या पोलिसाने दिक्षीतचा अपघात झाला असून त्याला राजावाडी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याचे सांगितले. त्यामुळे राजपूत कुटुंबिय राजावाडी हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे त्यांना दिक्षीतच्या बाईकला एका बेस्ट बसने धडक दिल्याचे समजले होते. या अपघातात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्याला रात्री उशिरा मृत घोषित करण्यात आले होते. याप्रकरणी त्याची आई लक्ष्मी विनोद राजपूत हिच्या तक्रारीवरुन देवनार पोलिसांनी अपघाताची नोंद करुन बसचालक विनोद आप्पाजी रणखांबे याला अटक केली होती.