आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ डिसेंबर २०२४
मुंबई, – मुलुंड येथे दिपक पिहाल या ४५ वर्षांच्या रिक्षचालकाने शेजार्याकडून होणार्या मानसिक त्रासासह खोट्या पोलीस तक्रारीला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मुलुंड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी विजय अर्जुन जेठवा या आरोपीविरुद्ध मुलुंड पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. रिक्षा पार्क करण्यावरुन शेजारीच राहणार्या दिपक आणि विजय यांच्यात वाद होता. त्यातून सुरु असलेल्या वादासह पोलीस ठाण्यातील खोट्या तक्रारीनंतर दिपकने आत्महत्या केल्याचे बोलले जाते. दरम्यान त्यांच्या आत्महत्येने मुलुंड कॉलनीतील रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.
विनय ऊर्फ रोहन दिपक पिहाल हा मुलुंडच्या मुलुंड कॉलनी, रामदेव नगर परिसरात राहतो. मृत दिपक हे त्याचे वडिल असून ते रिक्षाचालक, त्याची आई हाऊसकिपिंग तर विनय हा पार्ट टाईम नोकरी करतो. त्यांच्याच शेजारी विजय जेठवा हा त्यच्या कुटुंबियांसोबत राहत असून गेल्या दोन महिन्यांपासून दोन कुटुंबामध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद सुरु होता. घरासमोरील जागेवर दिपक हे त्यांची रिक्षा पार्क करत होते. मात्र या जागेवर दुरुस्तीचे काम करायचे असल्याचे सांगून विजयने स्थानिक रहिवाशांच्या सह्या घेऊन त्या जागेवर पायरी बांधल्या होत्या. त्यामुळे दिपक यांना तिथे त्यांची रिक्षा पार्क करता येत नव्हती. त्यामुळे त्यांनी त्या पायर्या तोडून ती जागा पुन्हा पहिल्यासारखी केली होती. याच कारणावरुन त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते.
या वादातून विजय हा दिपकसह त्यांच्या कुटुंबियांना सतत बघून घेण्याची धमकी देत होता. गेल्या काही दिवसांपासून विजयसह त्याचे दोन मुले निलेश ऊर्फ विकी आणि सुजल हे दिपक यांच्याशी क्षुल्लक कारणावरुन वाद घालून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कुटुंबियाला घाटकोपर येथील मामाच्या घरी पाठविले होते. हा वाद संपल्यानंतर त्यांनी घरी यावे असेही सांगितले होते. दुसरीकडे ते स्वत आजी आणि मामाच्या तीन मुलांसोबत तिथे राहत होते. या वादानंतर विजयने दिपक यांच्याविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात खोट्या तक्रारी करण्यास सुुरुवात केली होती. या तक्रारीमुळे ते प्रचंड मानसिक तणावात होते. त्यातून आलेल्या नैराश्यातून शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता दिपक यांनी त्यांच्या घरातील पोटमाळ्यावर छताला पाईपला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली होती.
ही माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दिपक यांना तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. याप्रकरणी विनयची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीत त्याने घडलेला प्रकार सांगून आरोपी विजय जेठवाविरुद्ध तक्रार केली होती. त्याच्याकडून सुरु असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून त्याचे वडिल दिपक पिहाल यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीनंतर विजय जेठवाविरुद्ध पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.