बाजार भावापेक्षा स्टिल माल देतो असे सांगून ३६ कोटीची फसवणुक
खाजगी कंपनीच्या दोन संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ डिसेंबर २०२४
मुंबई, – बाजार भावापेक्षा स्टिल मालाची डिलीव्हरीचे आमिष दाखवून एका स्टिल व्यावसायिकाची सुमारे ३६ कोटीची फसवणुक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका खाजगी कंपनीच्या दोन संचालकाविरुद्ध अंधेरी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मुर्तजा युनूस शकीर आणि शिरीन युसूफ शकीर अशी या दोघांची नावे असून ते दोघेही झॅग्रोस हार्डवेअर ट्रेडिंग कंपनीचे संचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सिद्धार्थ प्रफुल्ल मगिया स्टिल हे स्टिल व्यावसायिक असून अंधेरीतील नित्यानंदनगर परिसरात राहतात. त्यांची डीआय स्टिल्स प्रायव्हेट लिमिडेट नावाची एक खाजगी कंपनी असून या कंपनीचे अंधेरीतील जुना नागरदास रोड, चिनॉय कॉलेजवळवर एक कार्यालय आहे. गेल्या वर्षी त्यांची मुर्तजा आणि शिरीन यांच्याशी ओळख झाली होती. ते दोघेही स्टिल व्यवसायाशी संबंधित असल्याने त्यांची चांगली मैत्री झाली होती. या दोघांनी त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांना बाजार भावापेक्षा कमी दरात स्टिल माल देण्याचे आश्वासन दिले होते. सुरुवातील पाच ते आठ आणि नंतर दहा ते पंधरा टक्के मार्जीन ठेवून पुरवठा करतो असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडून ऑगस्ट ते डिसेंबर २०२३ या कालावधीत काही स्टिल मालाची ऑर्डर दिली होती.
ठरल्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या वेळेत मालाची डिलीव्हरी करुन त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे त्यांनी १७ फेब्रुवारी ते मे २०२४ या कालावधीत त्यांच्याकडे ६ हजार ३२९ मेट्रीक टन स्टिलची मागणी केली होती. या स्टिल मालासाठी त्यांनी त्यांच्या कंपनीला ३६ कोटी १५ लाख ७६ हजार रुपयांचे पेमेंट केले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी स्टिल मालाची डिलीव्हरी केली होती. विचारणा केल्यानंतर ते दोघेही त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. दोन ते तीन उलटूनही त्यांनी मालाची डिलीव्हरी केली नव्हती. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती.
मात्र त्यांनी त्यांना पेमेंटही परत केले नाही. शकीर कुटुंबिय मूळचे नागपूरचे रहिवाशी असल्याने सिद्धार्थ मगिया हे नागपूरला गेले होते. मात्र या दोघांकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. बाजार भावापेक्षा कमी किंमतीत स्टिल मालाची डिलीव्हरीचे आश्वासन देऊन या दोघांनी त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षातय येताच त्यांनी अंधेरी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मुर्तजा शकीर आणि शिरीन शकीर या दोनही आरोपीविरुद्घ पोलिसांनी अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. या दोघांनी तक्रारदारासह इतर काही व्यावसायिकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.