मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ डिसेंबर २०२४
मुंबई, – पाच हजार कोटीच्या मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत डिजीटल अटकेची भीती दाखवून एका ८४ वर्षांच्या वयोवृद्धाची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे २० लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार गिरगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तोतया सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करणार्या अज्ञात सायबर ठगाविरुद्ध दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
प्रभाकर विठ्ठल मेहेंदळे हे त्यांच्या पत्नीसोबत गिरगाव परिसरात राहत असून त्यांच्या मालकीची एक खाजगी कंपनी आहे. १५ एप्रिलला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो दिल्लीतील सीबीआय कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. त्याने स्वतचे नाव सुनिलकुमार गौतम असल्याचे त्यांच्याविरुद्ध मनी लॉड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या आधारकार्डवरुन एका बँकेत खाते उघडण्यात आले होते. त्यात पाच हजार कोटी रुपये जमा झाले होते. हा मनी लॉड्रिंगचा प्रकार असल्याने त्यांच्यासह इतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याच गुन्ह्यांत त्यांना डिजीटल अटक करण्यात आली होती. त्यामुळे अटकेची कारवाई सुरु असताना त्यांना कोणाशी बोलता येणार नाही, कोणाला संपर्क साधता येणार नाही असे सांगितले. त्यांनी नियमांचे उल्लघंन केल्यास त्यांना त्यांच्या राहत्या घरी येऊन कायदेशीर अटक केली जाईल अशी भीती दाखविण्यात आली होती. या माहितीने त्यांना धक्काच बसला होता. त्यानंतर संबंधित सीबीआय अधिकार्याने त्यांच्याकडे त्यांच्या बँक खात्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना एका बँक खात्याची माहिती सांगून त्यात वीस लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते.
अटकेच्या भीतीने त्यांनी ती रक्कम संबंधित बँक खात्यत जमा केली होती. त्यानंतर त्यांना दर दोन तासांनी रिपोटींग करण्यास सांगण्यात आले होते. काही वेळानंतर त्यांनी हा प्रकार त्यांचा मामेभाऊ सुनिल गोरे यांना सांगितला. त्याने त्यांची अज्ञात सायबर ठगाकडून फसवणुक झाल्याचे सांगून त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी सायबर सेलच्या हेल्पलाईनसह दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी तोतया सीबीआय अधिकार्याविरुद्ध फसवणुकीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.