कांदिवलीतील व्यापार्‍याला दुप्पट रक्कमेचा पेढा पडला पन्नास लाखाला

तंत्रमंत्राच्या सहाय्याने गंडा घालणार्‍या पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० डिसेंबर २०२४
मुंबई, – दुप्पट रक्कमेच्या आमिषाला बळी पडून भोंदूबाबाने दिलेला प्रसादाचा पेढा एका व्यापार्‍याला ५० लाखाला पडल्याचा धक्कादायक प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. तंत्रमंत्राच्या सहाय्याने दुप्पट रक्कमेचे आमिष दाखवून व्यापार्‍याची फसवणुक केल्याप्रकरणी पाचजणांविरुद्ध समतानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यात शिवकुमार यादव, राजेश विश्‍वकर्मा, सूर्याबाबा आणि इतर दोघांचा समावेश आहे. पाचही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी समतानगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

कैलास लालाराम चौधरी हे व्यवसायाने व्यापारी असून त्यांचा कांदिवली परिसरात किराणा मालाचे एक दुकान आहे. सप्टेंबर २०२४ रोजी त्यांच्या दुकानात प्रमोद त्रिभुवन उपाध्याय ऊर्फ डब्बू हा सामान घेण्यासाठी आला होता. यावेळी त्याने त्यांना त्याच्या दुकानात एक तरुण आला होता, त्याने तो पैसे दुप्पट करुन देतो असे सांगितले होते. सुरुवातीला कैलास चौधरी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र ऑक्टोंबर महिन्यांत त्यांनी सहजच त्याच्याकडे संबंधित व्यक्तीची विचारणा केली होती. यावेळी त्या व्यक्तीची माहिती काढून असे सांगून तो निघून गेला. तीन दिवसांनी तो शिवकुमार यादवला घेऊन त्यांच्या दुकानात आला होता. यावेळी शिवकुमारने त्याला सूर्याबाबा हे सर्वांचे पैसे डबल करुन देतात. तुमचा विश्‍वास बसावा म्हणून त्याने सूर्याबाबाकडे घेऊन जातो आणि तिथे डेमो करुन दाखवितो असे सांगून त्यांचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ते शिवकुमारसोबत गोरेगाव येथील एम. जी रोडवरील एका निवासी इमारतीच्या आठव्या मजल्यावर गेले होते. तिथे सूर्याबाबा हा त्याच्या इतर पाच ते सहा सहकार्‍यासोबत बसला होता.

काही वेळानंतर शिवकुमार तिथे एक पुस्तक घेऊन आला होता. यावेळी सूर्याबाबाने ज्यांना पैसे डबल करुन हवे आहेत, त्यांनी पुस्तकात पैसे जमा करावे असे सांगितले. त्यामुळे कैलास चौधरी यांनी पुस्तकात शंभर रुपयांची एक नोट ठेवली होती. ही नोट ठेवल्यानंतर त्याने त्यावर एक कपडा ठेवला. काही वेळानंतर पुस्तकातून शंभर रुपयांच्या दोन नोटा निघाल्या. या प्रकाराने त्यांना धक्काच बसला होता. त्यानंतर ते तेथून निघून गेले. दुप्पट रक्कमेच्या आमिषाला बळी पडून त्यांनी जास्त रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याकडे त्यांच्या व्यवसायाचे तीस लाख रुपये होते, मित्र, नातेवाईकाकडून त्यांनी वीस लाखांची व्यवस्था केली. त्यानंतर ५० लाख रुपये दुप्पट करण्यासाठी पुन्हा तिथे गेले होते. यावेळी त्याने त्यांना दुसर्‍या रुमची व्यवस्था करण्यास सांगून तिथे तंत्रमंत्राच्या सहाय्याने ५० लाख रुपये दुप्पट करुन देतो असे सांगितले.

ठरल्याप्रमाणे बुधवारी १८ डिसेंबरला ते ५० लाख रुपये घेऊन शिवकुमारच्या कांदिवलीतील दामूनगर येथील नातेवाईकाच्या रुममध्ये आले होते. तिथे सूर्याबाबाने सर्वांना मोबाईल बंद करण्यास सांगून पूजा सुरु केली होती. पूजा संपल्यानंतर त्यांनी त्यांना प्रसाद खाण्यासाठी दिला. प्रसाद खाल्यानंतर त्यांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध झाले. दुसर्‍या दिवशी म्हणजे गुरुवारी १९ डिसेंबरला सकाळी दहा वाजता त्यांना जाग आली. यावेळी त्यांना ते सेव्हन स्टार हॉस्पिटलमध्ये असल्याचे समजले. तिथे त्यांचे नातेवाईक हजर होते. यावेळी त्यांनी त्यांच्या भावाला ही माहिती सांगितली. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.

हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज मिळताच ते समतानगर पोलीस ठाण्यात आले आणि तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी शिवकुमार यादव, राजेश विश्‍वकर्मा, सूर्याबाबा आणि त्याचे दोन सहकारी अशा पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत समतानगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दुप्पट रक्कमेसाठी पूजेचा प्रसाद खाणे तक्रारदार व्यापार्‍याला चांगलेच महागात पडले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page