मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ डिसेंबर २०२४
मुंबई, – गांजा तस्करीप्रकरणी दोन तरुणांना मालवणी पोलिसांनी अटक केली. अनिलकुमार हरिश्चंद्र सिंग आणि अंकित नेमचंदूर जैस्वाल अशी या दोघांची नावे असून ते दोघेही वसईतील रहिवाशी आहेत. या दोघांकडून पोलिसांनी दहा किलो गांजाचा साठा जप्त केला असून त्याची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये आहे. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मालाडच्या मालवणी परिसरात काहीजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मालवणी पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अमर शिंदे, पोलीस हवालदार कांबळी, गव्हाणे, पोलीस शिपाई शेख, टरके यांनी मालवणीतील खारोडी, ज्युरासिक पार्क, गावदेवी मंदिर रोडजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. शुक्रवारी रात्री उशिरा तिथे दोन तरुण आले होते. या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडील सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात या अधिकार्यांना दहा किलोचा गांजाचा साठा सापडला. त्याची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये आहे. हा साठा जप्त केल्यानंतर या दोघांनाही पुढील कारवाईसाठी मालवणी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
अनिलकुमार आणि अंकित हे दोघेही पालघरच्या वसईतील रहिवाशी असून खाजगी कंपनीत कामाला आहे. ते दोघेही मालवणी परिसरात गांजाची डिलीव्हरीसाठी आले होते. त्यासाठी त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन मिळणार होते, मात्र डिलीव्हरी करण्यापूर्वीच या दोघांना पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला आहे. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.