मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ डिसेंबर २०२४
मुंबई, – गृहकर्जाच्या सुमारे अठरा लाखांचा अपहार करुन एका ५८ वर्षांच्या व्यक्तीसह बँकेची फसवणुक केल्याप्रकरणी अजय मोरे या ठगाविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बोगस दस्तावेज सादर करुन बँकेतून गृहकर्ज करुन फसवणुक केल्याचा अजयवर आरोप आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
भाईंदरचे रहिवाशी असलेले महादेव हरी सरमळकर हे एका खाजगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. २४ वर्षांपूर्वी त्यांनी भाईंदर येथे ओसवाल बिल्डरकडून साडेतेरा लाखांना ओस्तवाल ऑमेट या अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट घेतला होता. या फ्लॅटवर त्यांनी गृहकर्ज काढले होते. ते कर्ज त्यांनी २००७ फेडले होते. पगारातून तिन्ही मुलांचा शिक्षणाचा खर्च भागत नव्हता. त्यामुळे त्यांनी तो फ्लॅट विक्रीचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान त्यांची गोरेगाव येथील रहिवाशी अजय मोरे आणि त्याची पत्नी अंजली मोरे यांच्याशी ओळख झाली होती. त्यांना त्यांचा फ्लॅट विकत घ्यायचा होता. त्यामुळे त्यांच्याशी सविस्तर चर्चा करुन त्यांनी फ्लॅट २१ लाख २३ लाखांमध्ये विक्रीचा निर्णय घेतला होता. या फ्लॅटसाठी अजय मोरे याने एका खाजगी बँकेत गृहकर्जासाठी अर्ज केला होता. मात्र त्याने पूर्ण पेमेंट केले नाही, त्यामुळे त्यांनी मोरे कुटुंबियांना फ्लॅटचा ताबा दिला नव्हता.
याच फ्लॅटमध्ये राहत असताना त्यांना संबंधित बँकेतून एक नोटीस प्राप्त झाली होती. त्यात फ्लॅटवर कर्ज असून कर्जाची परतफेड न केल्याने तो फ्लॅट त्यांनी खाली करावा असे नमूद करण्यात आले होते. चौकशीनंतर त्यांना अजय मोरे आणि अंजली मोरे यांनी त्यांच्या फ्लॅटवर १८ लाख २३ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांच्या नावाने बॅकेने दिलेला धनादेश त्यांना न देता त्यांनी बोगस अकाऊंट उघडून या पैशांचा परस्पर अपहार करुन त्यांच्यासह बँकेची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी अजय मोरे याच्याविरुद्ध कोर्टात एक याचिका दाखल केली होती. यावेळी कोर्टाने त्यांना बँकेचे पैसे भरुन फ्लॅटचा ताबा घेण्यास सांगून त्यांना अजय मोरे याच्याविरुद्घ पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश दिले होते.
कोर्टाच्या आदेशानंतर त्यांनी त्यांच्या वकिलामार्फत दादर पोलीस ठाण्यात तकार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अजय मोरे याच्याविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज सादर करुन बँकेतून गृहकर्ज घेऊन बँकेसह महादेव सरमळकर यांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.