व्यवसायाची कुरिअरने पाठविलेल्या ४२ लाखांची कॅशचा अपहार
माजी कर्मचार्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ डिसेंबर २०२४
मुंबई – व्यवयायाची कुरिअरने पाठविलेली सुमारे ४२ लाखांची कॅश एका माजी कर्मचार्याने पळवून नेल्याची घटना पायधुनी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमृत राम देवासी या २० वर्षांच्या माजी कर्मचार्याविरुद्ध पायधुनी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या अमृतचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. तो त्याच्या राजस्थानच्या गावी पळून गेल्याची शक्यता असल्याने एक टिम तिथे पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गौतम दिलीप गिरी हे मूळचे मध्यप्रदेशातील जबलपूरचे रहिवाशी आहे. सध्या ते त्यांच्या आई आणि कामगारासोबत काळबादेवी परिसरात राहतात. त्यांचा इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि खेळण्याचा होलसेलचा व्यवसाय आहे. या व्यवसायात त्यांना त्यांचे काका पंजू मोतीगिरी गोस्वामी आणि त्यांचा मुलगा कालू मोतीगिरी गोस्वामी हे दोघेही मदत करतात. हेमाराम देवासी ऊर्फ दिलीप हा त्यांचा कर्मचारी असून तो अहमदनगर येथे राहतो. त्यांच्याकडे व्यवसाात गुंतवणुक करणारे व्यक्ती कॅश स्वरुपात पैसे देतात. ते पैसे दिलीपकडे जमा झाल्यानंतर तो त्यांना कुरिअरच्या माध्मयातून पेमेंट पाठवितो. काही दिवसांपूर्वी त्याच्याकडे त्यांच्या व्यवसायाची ४२ लाख ५० हजाराची कॅश जमा झाली होती. त्यामुळे त्याने ती कॅश कुरिअरद्वारे पाठवत असल्याचे गौतम गिरी यांना सांगितले होते. ते पार्सल त्याने राहुल एक्सप्रेस लॉजिस्टिक या खाजगी कुरिअरद्वारे पाठवून दिले होते.
कुरिअर २५ डिसेंबरला पायधुनीतील वोरा इमारतीच्या कार्यालयात जमा झाले होते. ते पार्सल घेण्यासाठी दिलीप हा स्वत कुरिअरच्या कार्यालयात आला होता. यावेळी त्याला त्यांच्या कार्यालयातील एका कर्मचार्याने संबंधित पार्सल घेऊन गेल्याचे समजले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी कुरिअर कार्यालयातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. या फुटेजमध्ये अमृत देवासी हा संबंधित पार्सल घेऊन जात असल्याचे दिसून आले. अमृत हा त्यांच्याकडे पूर्वी कामाला होता. तो कामात हलगर्जीपणा करत होता, त्याच्या गैरवर्तुणकीमुळे त्याला गौतम गिरी यांनी कामावर काढून टाकले होते. त्यानेच गौतम गिरी यांचा नोकर असल्याचे सांगून ते पार्सल घेतले आणि काही वेळानंतर तो निघून गेला होता.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गौतमसह दिलीपने अमृतला कॉल केला होता. मात्र त्याचा कॉल बंद येत होता. हा प्रका दिलीपकडून समजताच गौतम गिरी यांनी पायधुनी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी माजी नोकर अमृत देवासी याच्याविरुद्ध ४२ लाख ५० हजार रुपयांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. अमृत हा राजस्थानचा रहिवाशी असून तो त्याच्या गावी पळून गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी एक टिम लवकरच राजस्थानला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.