मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ डिसेंबर २०२४
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका बाईकच्या धडकेने पद्मसिंह धनसिंह नेपाळी या ८५ वर्षांच्या वयोवृद्धाचा मृत्यू झाला. अपघातानंतर बाईकस्वार पळून गेला असून त्याच्याविरुद्ध पवई पोलिसांनी हलगर्जीपणाने बाईक चालवून एका वयोवृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी बाईकस्वाराचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा अपघात शुक्रवारी दुपारी दोन वाजता पईतील मनुभाई चाळ, बुद्धविहारसमोरील लुबिनीजवळ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. लिला इंद्र सिंग ही महिला तिच्या पती आणि तीन मुलांसोबत पवईतील चांदीवली परिसरात राहते. तिचे पती इंद्र सिंह हे चालक म्हणून काम करतात. तिचे सासरे पद्मसिंह आणि सासू भारती नेपाळी हे दोघेही त्यांच्याच शेजारी राहतात. शुक्रवारी दुपारी दोन वाजता तिचे सासरे पद्मसिंह हे बँकेत जात होते. यावेळी मागून भरवेगात जाणार्या एका बाईकने त्यांना जोरात धडक दिली होती. या अपघातात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघातानंतर बाईकस्वार त्यांना कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला होता. अपघाताची माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
जखमी झालेल्या पद्मसिंह यांना एस्कॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची सोयन नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान सायंकाळी सव्वासात वाजता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी लिला सिंग हिच्या तक्रारीवरुन पवई पोलिसांनी आरोपी बाईकस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.