मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० डिसेंबर २०२४
मुंबई, – घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल होताच या कटाचा एक आरोपी व्यावसायिक अर्शद खान याला उत्तरप्रदेशातून गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने अटक केली. अर्शद हा गेल्या सात महिन्यांपासून वॉण्टेड होता, अखेर त्याला सात महिन्यांनी गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. होर्डिंग बनविणार्या इगो मिडीया कंपनीकडून अर्शद खानने ४६ लाख रुपये घेतल्याचा आरोप असून या आर्थिक व्यवहाराबाबत त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
१३ मे २०२४ रोजी घाटकोपर येथे एक जाहिरात होर्डिंग जवळच असलेल्या एका पेट्रोलपंपावर कोसळून त्यात सतराजणांचा मृत्यू झाला होता तर पन्नासहून अधिक लोक जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर पंतनगर पोलिसांनी इगो कंपनीचे भावेश भिंडेसह इतर आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यवधासह भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच भावेशच्या घरासह कार्यालयात पोलिसांनी छापा टाकला होता. दुसर्या दिवशी राजस्थानच्या उदयपूरच्या एका हॉटेलमधून भावेश पुजारा या नावाने राहणार्या भावेश भिडे याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या अटकेनंतर कंपनीच्या माजी संचालिका जान्हवी मराठे, सागर पाटील आणि स्ट्रक्चरल अभियंता मनोज संघूला पोलिसांनी अटक केली होती.
चौकशी पूर्ण होताच या सर्व आरोपीविरुद्ध विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. याच आरोपपत्रात गोवंडीचा व्यावसायिक अर्शद खान याला वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले होते. या संपूर्ण कटात त्याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे त्याला चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले होते. मात्र समन्स पाठवूनही तो चौकशीसाठी हजर झाला नव्हता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना अर्शद हा उत्तरप्रदेशात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने अर्शदला उत्तरप्रदेशातून अटक केली. २०२१-२२ साली इगो मिडीयाने दहा बँक खात्यात ३९ व्यवहारामध्ये ४६ लाख ५० हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम अर्शद खानच्या बँक खात्यात जमा झाले होते. या सर्व व्यवहाराबाबत त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.