मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ जानेवारी २०२४
मुंबई, – गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यांत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी राज्यमंत्री झियाउद्दीन अब्दुल रहिम सिद्धीकी ऊर्फ बाबा सिद्धीकी यांच्या झालेल्या हत्येप्रकरणी अखेर गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी ४५९० पानाचे आरोपपत्र मोक्का कोर्टात सादर केले होते. त्यात १८० जणांची साक्ष नोंदविण्यात आली असून तिघांना वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यात या कटाचा मुख्य आरोपी अनमोल लविंदरसिंग बिश्नोई ऊर्फ भानू ऊर्फ भाईजी ऊर्फ एबी भाई याच्यासह कट यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडणार्या मोहम्मद यासिन अख्तर ऊर्फ मोहम्मद जमील ऊर्फ जिशान अख्तर ऊर्फ मोहम्मद जसीन ऊर्फ अख्तर ऊर्फ जुल्मी ऊर्फकेही ऊर्फ जस्सी आणि शुभम रामेश्वर लोणकर ऊर्फ शुब्बू यांचा समावेश आहे. बिश्नोई टोळीची दशहत निर्माण करण्यासाठीच बाबा सिद्धीकी यांची हत्या झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. याचबरोबर सिनेअभिनेता सलमान खान याच्यासोबत जवळीक बाबा सिद्धीकी यांच्यावर जिवावर बेतल्याचे बोलले जाते. याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यास पोलिसांनी नकार दिला.
बाबा सिद्धीकी हे कॉंग्रेस पक्षातून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात गेले होते. माजी राज्यमंत्री असलेले बाबा सिद्धीकी यांचा मुलगा झिशान सिद्धीकी हा आमदार होता. त्याचे वांद्रे येथे कार्यालय आहे. १२ ऑक्टोंबरला याच कार्यालयातून घरी जात असताना वांद्रे येथे त्यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी अंधाधूंद गोळीबार केला होता. त्यात बाबा सिद्धीकी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकणी निर्मलनगर पोलिसांनी हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. या गुन्ह्यांचा तपास हाती घेताना गोळीबारानंतर पळून जाणार्या गुरमेल बलजीत सिंग आणि धर्मराज राधे कश्यप या दोन शूटरला पोलिसांनी अटक केली.
त्यांच्या चौकशीतून या संपूर्ण हत्येचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कटात कोणाचा सहभाग होता याचे नाव समोर आले होते. त्यांनतर गुन्हे शाखेच्या विविध पथकाने पुणेसह पंजाब आणि इतर राज्यातून इतर २४ आरोपींना अटक केली होती. त्यात प्रविण रामेश्वर लोणकर, हरिशकुमार बालकराम निशाद, नितीन गौतम सप्रे, प्रदीप दत्तू ठोंबरे, चेतन दिलीप पारधी, संभाजी किसन पारधी, राम फुलचंद कनोजिया, भगवतसिंग ओमसिंग, अमीत हिसमसिंग कुमार, रुपेश राजेंद्र मोहोळ, करण राहुल साळवे, शिवम अरविंद कोहाड, सुजीत सुशील सिंग, गौरव विलास आपुणे, आदित्य राजू गुळणकर आणि रफिक नियाज शेख, शिवकुमार गौतम ऊर्फ शिवा बालकिशन गौतम, अनुराग राधेश्याम कश्यप, ज्ञानप्रकाश प्रदीपकुमार त्रिपाठी, आकाश बृजकुमार श्रीवास्तव आणि अखिलेंद्र प्रतापसिंह सुरेशसिंह, आकाशदिप कारजसिंग गिल, सलमानभाई इक्बालभाई बोहरा, सुमीत दिनकर वाघ यांचा समावेश होता.
या सर्वांविरुद्ध नंतर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच काही आरोपींना पुन्हा अटक करुन त्यांची चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली होती. याच गुन्ह्यांत सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत होते. या गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाल्याने सोमवारी २६ आरोपींविरुद्ध गुन्हे शाखेने मोक्का न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. ४५९० पानांच्या या आरोपपत्रात १८० जणांची जबानी नोंदविण्यात आली आहे. या गुन्ह्यांत ते सर्वजण साक्षीदार आहेत. १८० भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत ७४ तर १८३ भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत १४ जणांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. या गुन्ह्यांत आतापर्यंत पोलिसांनी पाच देशी बनावटीचे पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, सहा मॅगझीन, ८४ जिवंत काडतुसांचा साठा जप्त केला आहे.
गुन्हेगारी जगतात स्वतच्या टोळी वर्चस्व स्थापन करण्यासाठी बिश्नोई टोळीचा मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई याने त्याच्या सहकार्यांच्या मदतीने बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. तसेच बाबा सिद्धीकी यांचे सिनेअभिनेता सलमान खानसोबत जवळचे संबंध होते. त्यामुळे सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर गोळीबार केल्यानंतर त्यांनी बाबा सिद्धीकी यांना टार्गेट केले होते. त्यांच्या हत्येनंतर बॉलीवूडसह राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली होती. ही दहशत निर्माण व्हावी यासाठी अनमोल बिश्नाईने बाबा सिद्धीकी यांची हत्या घडवून आणल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांतील सर्वच्या सर्व २६ आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल झाल्याने या खटल्याची आता नियमित सुनावणी होणार आहे. आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी भक्कम पुरावे असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.