टोरेस घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

कंपनीचे तीन बँक खात्यासह लॉकर फ्रिज

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ जानेवारी २०२५
मुंबई, – गुंतवणुकीवर आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून लाखो गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी टोरेस कंपनीच्या घोटाळ्याचा तपास शिवाजी पार्क पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. या गुन्ह्यांतील पोलीस कोठडीत असलेल्या तिन्ही आरोपींसह गुन्ह्यांतील कागदपत्रे संबंधित पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. मंगळवारी सातशे गुंतवणुकदारांची माहिती गोळा केल्यानंतर बुधवारीही एक हजारापेक्षा अधिक गुंतवणुकदारांची माहिती घेण्यात आली होती. कंपनीच्या तीन बँक खात्यासह लॉकर फ्रिज करण्यात आले आहे. या कटातील दोन संचालक आणि पदाधिकारी विदेशात पळून गेल्याचे वृत्त असून त्याची पोलिसांकडून शहानिशा सुरु आहे. दरम्यान आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी सर्वच आंतरराष्ट्रीय विमानतळावर लुक आऊट नोटीस बजाविली आहे.

टोरेस ज्वेलरी फसवणुकप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत कंपनीचे संचालक सर्वेश अशोक सुर्वे, महाव्यवस्थापक तानिया कसातोवा आणि स्टोअर इंचार्ज व्हेलेंटिना कुमार या तिघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या तिघांनाही स्थानिक न्यायालयाने १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. टोरेस कंपनीचे दादर, ग्रँटरोड, मिरारोड, नवी मुंबईतील सानपाडा, कल्याण आणि कांदिवली परिसरात शाखा आहे. अलीकडेच कंपनीने कांदिवली परिसरात एक शाखा उघडली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच मंगळवारी काही गुंतवणुकदारांनी शाखेत धाव घेतली आहे. संतप्त गुंतवणुकदारांनी कार्यालयाच्या काचा फोडल्याने कांदिवली पोलिसांनी संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या सर्व शाखांमध्ये अनेक गुंतवणुकदारांना विविध योजनेत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. त्यांना आकर्षक व्याजदाराचे गाजर दाखविण्यात आले होते.

प्राथमिक तपासात १ जानेवारी ते ५ जानेवारी या कालावधीत सर्वांत जास्त गुंतवणुक करण्यात आली होती. या सर्व गुंतवणुकदारांना अकरा टक्के व्याजदाराचे आमिष दाखविण्तया आले होते. त्यासाठी कंपनीने खास ऑफर जाहीर केली होती. या ऑफरला बळी पडून हजारो गुंतवणुकदारांनी कंपनीत गुंतवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुंतवणुकदारामध्ये अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा सहभाग आहे. आतापर्यंत कंपनीत एक ते सव्वालाख गुंतवणुकदारांनी एक ते दिड हजार कोटीची फसवणुक केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा तपास बुधवारी शिवाजी पार्क पोलिसाकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानतर या शाखेचे एक विशेष पथक शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या अधिकार्‍यांनी गुन्ह्यांचे सर्व कागदपत्रांसह तिन्ही आरोपींचा ताबा घेतला आहे. यावेळी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात फसवणुक झालेले एक हजाराहून गुंतवणुकदारांनी धाव घेतली होती.

रात्री उशिरापर्यंत या सर्व गुंतवणुकदारांची माहिती गोळा करण्याचे काम सुरु होते. गुन्हा दाखल होताच कंपनीचे संचालकासह इतर आरोपी विदेशात पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली. इतर संचालकासह पदाधिकारी अद्याप फरार असल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान कंपनीच्या बँक खात्यातील सर्व व्यवहार थांबविण्यात आले असून तीन बँक खाती गोठविण्यात आले आहे. कंपनीचे बँकेतील लॉकरही फ्रिज करण्यात आले आहे. येत्या आठवड्यात इतर गुंतवणुकदारांची माहिती गोळा केली जाणार आहे. दरम्यान मंगळवारी सातशेहून अधिक गुंतवणुकदारांची माहिती घेण्यात आली होती, तसेच आजही अनेकांचे माहिती घेण्यात आल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले.

या गुन्ह्यांतील दोन प्रमुख आरोपी, संचालक आणि सीईओ तौफिक रियाज ऊर्फ जॉन कारटर आणि व्हिक्टोरिया कोवालेन्क्रो हे दोघेही विदेशात पळून गेल्याची माहिती आहे. याबाबतची शहानिशा करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान इतर आरोपी विदेशात पळून जाऊ नये म्हणून सर्व विमानतळावर लुक आऊट नोटीस बजाविण्यात आली आहे. दरम्यान या गुन्ह्यांचा खरा सूत्रधार कोण याचाही पोलीस तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page