मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – पवईतील बेस्ट बस अपघातात राज संदीप बोबडे या २१ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला तर वांद्रे येथील अन्य एका अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या एका ७० ते ७५ वर्षांच्या वयोवृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पवई आणि खेरवाडी पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. दोन्ही अपघातानंतर आरोपी चालक अपघातातील जखमींना कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेले आहेत. त्यामुळे या दोन्ही चालकांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पहिला अपघात रविवारी सकाळी साडेसात ते पावणेआठच्या सुमारास पवईतील आरे रोड, महानगरपालिका जल शुद्धीकरण केंद्र, महात्मा फुले नगर परिसरात झाला. संदीप शंकर बोबडे हे विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात राहत असून एका आयटी कंपनीत कामाला आहेत. रविवारी सकाळी ते त्यांच्या मुलगा मुलगा राजसोबत मासे आणण्यासाठी त्यांच्या स्कूटीवरुन जात होते. आरे रोडवर रस्ता चढणीचा होता. त्यातच पाणी वाहत असल्याने रस्ता ओलसर झाला होता. महानगरपालिका जल शुद्धीकरण केंद्रासमोरुन जाताना त्यांची स्कूटी स्लीप झाली आणि ते त्यांच्या मुलासोबत खाली पडले होते. याच दरम्यान मागून भरवेगात येणार्या बेस्ट बसने या दोघांनाही जोरात धडक दिली. त्यात त्यांच्या दोन्ही पायांना आणि हाताला दुखापत झाली तर राज याच्या अंगावरुन बस गेल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता.
जखमी दोघांनाही काही लोकांनी तातडीने हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. राज याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नंतर राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी संदीप बोबडे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बेस्ट बसचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने बस चालवून एका तरुणाच्या मृत्यूस तर दुसर्याला गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकणी गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर बसचालक जखमींना कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला होता. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
दुसर्या अपघातातील एका ७० ते ७५ वर्षांच्या वयोवृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. २४ जानेवारीला सायंकाळी साडेसात वाजता वांद्रे येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, टिचर्स कॉलनीतील दक्षिण वाहिनीवर एका अज्ञात वाहनाने एका वयोवृद्धाला धडक दिली होती. या अपघातात वयोवृद्ध व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान गुरुवार ६ फेब्रुवारीला त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर रविवारी ९ फेब्रुवारी पोलीस हवालदार प्रविण शंकरराव महापुरे यांच्या तक्रारीवरुन खेरवाडी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मृत वयोवृद्धाची ओळख पटली नसून त्यांची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत.