व्यवसायासाठी आणलेल्या 1.85 कोटीच्या कॅशची चोरी

नोकरासह दोघांना 1 कोटी 55 लाखांची कॅश हस्तगत

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 मार्च 2025
मुंबई, – व्यवसायासाठी आणलेल्या 1 कोटी 85 लाखांची कॅश चोरी करुन पळून गेलेल्या दोन आरोपींना व्ही. पी रोड पोलिसांनी अटक केली आहे. त्यात कार्यालयातील एका नोकराचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. धनजी प्रविणसिंह राजपूत आणि विजय मानाजी राजपूत अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे गुजरातचे रहिवाशी आहेत. या दोघांकडून पोलिसांनी चोरीची 1 कोटी 55 लाख 99 हजार 500 रुपयांची कॅश हस्तगत केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत हितेश देवजीभाई राजपूत या तिसर्‍या आरोपीचा सहभाग उघडकीस आला असून त्याला या गुन्ह्यांत पोलिसांनी पाहिजे आरोपी दाखविले आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

हितेश रजनीकांत खत्री हे व्यावसायिक असून त्यांचा कुरिअर सर्व्हिसचा व्यवसाय आहे. गिरगाव येथील दुसरा भोईवाडा, इमारत क्रमाक 58 च्या दुसर्‍या मजल्यावर त्यांचे एक खाजगी कार्यालय आहे. याच कार्यालयात नरेश राजपूत आणि विजय राजपूत हे दोघेही कामाला आहेत. दिवसभर काम करुन ते दोघेही रात्री तिथे झोपत होते. हितेश खत्री यांना व्यवसायानिमित्त पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्य सहा मित्रांकडून 1 कोटी 85 लाख रुपये उधारीवर घेतले होते. ही रक्कम त्यांनी त्यांच्या कार्यालयातील कपाटात सुरक्षित ठेवली होती. या कॅशबाबत नरेश आणि विजय या दोघांनाही माहिती होती.

22 फेब्रुवारीला नरेशने हितेश खत्री यांना कॉल करुन कपाटातील 1 कोटी 85 लाखांची कॅश चोरीस गेल्याची माहिती सांगितली. त्यामुळे ते त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यांनी कार्यालयातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यांना विजय हा कपाटातील कॅश चोरी करुन पळून जात असल्याचे दिसून आले. यावेळी विजयसोबत इतर दोन तरुण होते. या तिघांनी बोगस चावीच्या सहाय्याने कपाटातील कॅश चोरी केली. त्यापूर्वी त्यांनी कार्यालयातील सीसीटिव्ही फुटेज बंद केले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी व्ही. पी रोड पोलिसांना ही माहिती सांगितली. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून विजयसह इतर दोघांचा शोध सुरु केला होता.

ही शोधमोहीम सुरु असताना मुंबई सेंट्रल रेलवे स्थानकात आलेल्या धनजी राजपूतला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे पोलिसांना 1 कोटी 4 लाख 99 हजार 500 रुपयांची कॅश सापडली. या कॅशबाबत विचारणा केल्यानंतर त्याने हितेश खत्री यांच्या कार्यालयात चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी व्ही. पी रोड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. त्याच्या अटकेनंतर पळून गेलेल्या विजयला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 51 लाखांची कॅश जप्त केली. अशा प्रकारे दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून पोलिसांनी 1 कोटी 55 लाख 99 हजार हजार 500 रुपयांची कॅश जप्त केली होती.

या दोघांच्या अटकेनंतर त्यांचा तिसरा सहकारी हितेश राजपूत हा पळून गेला आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे. या गुन्ह्यांत अद्याप 29 लाख 500 रुपयांची कॅश हस्तगत करणे बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. हितेश खत्री यांनी कार्यालयात 1 कोटी 85 लाखांची कॅश ठेवल्याची माहिती विजयला होती. त्यामुळे त्याने धनजी आणि हितेशच्या मदतीने कार्यालयात चोरीची योजना बनविली होती. ठरल्याप्रमाणे त्याने कपाटाची बोगस चावी बनविली होती. त्यानंतर त्यांनी कार्यालयातील ही कॅश चोरी करुन पळून गेले. चोरीनंतर ते तिघेही गुजरातला जाणार होते. मात्र धनजीच्या अटकेने या चोरीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page