बुकींग केलेला फ्लॅट भावाच्या नावावर करुन आर्थिक फसवणुक
1.21 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी बिल्डरसह भावाविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 मार्च 2025
मुंबई, – बुकींग केलेला फ्लॅट परस्पर भावाच्या नावावर करुन या फ्लॅटवर एका खाजगी क्रेडिट सोसायटीकडून गृहकर्ज घेऊन एका हॉटेल व्यावसायिकाची 1 कोटी 21 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन्ही बिल्डरसह आरोपी भावाविरुद्ध डी. एन नगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. विपुल शहा, मुरली विपुल शहा आणि संतोष महाबल शेट्टी अशी या तिघांची नावे आहेत. यातील शहा व्यवसायाने बिल्डर तर संतोष हा तक्रारदार हॉटेल व्यावसायिकाचा भाऊ असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांना चौकशीसाठी हजर राहण्याचे लवकरच समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुरेंद्र महाबल शेट्टी हे हॉटेल व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत कुर्ला येथे राहतात. त्यांना एका फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती, त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान त्यांना अंधेरीतील जे. पी रोडवर गोकुळ पंचवटी नावाच्या एका इमारतीचे बांधकाम सुरु असल्याची माहिती समजली होती. या इमारतीचे बांधकाम सूर्या लॅण्डमार्क डेव्हपर्स प्रायव्हेट कंपनीकडून सुरु होते. याच कंपनीत विपुल शहा आणि मुरली शहा हे दोघेही संचालक म्हणून काम करत होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रस्तावित इमारतीमध्ये थ्री बीएचकेचा एक फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. याच फ्लॅटसंदर्भात त्यांनी विपुल शहा व मुरली शहा यांची भेट घेतली होती. त्यांनीही त्यांना कमी किंमत फ्लॅट देण्याचे आश्वासन देत त्यांना फ्लॅट बुकींग करण्याचा सल्ला दिला होता.
जून 2017 ते मार्च 2022 या कालावधीत त्यांनी त्यांना फ्लॅटसाठी एक कोटी नऊ लाख रुपये तर त्यांचा भाऊ संतोष शेट्टी याने बारा लाख रुपये दिले होते. या पेमेंटनंतर त्यांना फ्लॅटचे अलोटमेंट लेटर आणि समझौता कराराचे कागदपत्रे देण्यात आले होते. हा फ्लॅट सुरेंद्र शेट्टी व त्यांच पत्नीच्या संमतीशिवाय त्यांचा भाऊ संतोष शेट्टी याने नोंदणीकृत करुन घेतला. फ्लॅटचे खरेदी-विक्रीचे दस्तावेज बनवून घेतले. इतकेच नव्हे तर फ्लॅटचे कागदपत्रे त्याने एका क्रेडिट सोसायटीमध्ये गहाण ठेवून गृहकर्ज घेतले होते. या गृहकर्जाबाबत त्यांना काहीच माहिती नव्हती.
अशा प्रकारे विपुल शहा आणि मुरली शहा यांनी संतोष शेट्टी याच्या मदतीने त्यांनी खरेदी केलेल्या फ्लॅटची परस्पर त्यांच्या भावासोबत करार करुन त्यांची 1 कोटी 21 लाखांची आर्थिक फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच सुरेंद्र शेट्टी यांनी त्यांच्या भावासह दोन्ही बिल्डरविरुद्ध डी. एन नगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर विपुल शहा, मुरली शहा आणि संतोष शेट्टी या तिघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या तिघांची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.