कौटुंबिक वादातून ५३ वर्षांच्या सासर्‍याची जावयाकडून हत्या

हत्येसाठी तीन लाखांची सुपारी; चारही मारेकर्‍यांना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ मार्च २०२४
मुंबई, – कौटुंबिक वादातून ५३ वर्षांच्या सासर्‍याची जावयाने हत्या घडवून आणल्याची घटना नंदूरबार परिसरात उघडकीस आली आहे. राजेंद्र उत्तमराव मराठे असे मृत सासर्‍याचे नाव असून त्यांच्या हत्येसाठी आरोपी जावई गोविंद सुरेश सोनार यानेच आरोपींना तीन लाख रुपयांची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या हत्येनंतर सुरतमार्गे बोरिवलीतील गोराई परिसरात आलेल्या चारही आरोपींना कांदिवली युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून अटकेनंतर या चौघांनाही पुढील कारवाईसाठी नंदूरबार स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले आहे.

मिनाक्षी राजेंद्र मराठे ही महिला नंदूरबार, शहादा, सदाशिवनगरात तिचे पती राजेंद्र आणि मुलासोबत राहते. १४ मार्चला तिने शहादा पोलीस ठाण्यात तिचे पती मिसिंग झाल्याची तक्रार केली होती. तिचे पती मार्केटमध्ये सामान आणण्यासाठी गेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परत आले नाही. त्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला होता. मात्र ते कुठेच सापडले नाही. त्यामुळे तिने पोलिसात मिसिंग तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी राजेंद्र मराठे यांचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना दोन दिवसांनी म्हणजे १६ मार्चला स्थानिक पोलिसांना नांदर्डे-तळोदा रोडवर, फरशी पुलाखालील सार्वजनिक ठिकाणी एका व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. या मयताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु असताना मिनाक्षी मराठे यांचा मुलगा प्रदुमन याने तो मृतदेह त्यांचे वडिल राजेंद्र मराठे यांचा असल्याचे सांगितले होते. या घटनेनंतर शहादा पोलिसांनी अज्ञात व्यक्तहीविरुद्ध हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत होते.

तपासादरम्यान काही संययितांची नावे समोर आली होती. त्यांचा शोध सुरु असताना ते मारेकरी बोरिवलीतील गोराई परिसरात वास्तव्यास असून ते तेथूनही पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती नंतर गुन्हे शाखेच्या युनिट अकराच्या अधिकार्‍यांना देण्यात आली होती. या माहितीचे गांभीर्य लक्षात येताच पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण, पोलीस निरीक्षक भरत घोणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, कांबळे, मेतर, सहाय्यक फौजदार नाईक, पोलीस हवालदार चंद्रसेन गायकवाड, महादेव नावगे, विकी खांडेकर, प्रविण सावंत, कदम, सचिन खताते, पोलीस शिपाई देशमुख, महिला पोलीस शिपाई शेख, गोसावी यांनी गोराई परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. याच दरम्यान गोराई येथील पेप्सी ग्राऊंडसमोरुन पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या निलेश बच्चू पाटील, लकी किशोर बिरारे यांच्यासह सतरा आणि सोळा वयोगटातील दोन अल्पवयीन मुले अशा चौघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांना युनिट अकराच्या कार्यालयात आणून त्यांची चौकशी करण्यात आली होती.

या चौकशीत त्यांनीच राजेंद्र मराठे यांची गळा आवळून आणि नंतर लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करुन हत्या केल्याची कबुली दिली. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेहावर केमिकल ओतून मृतदेह जाळून टाळण्याचा प्रयत्न केला होता. हत्येसह पुरावा नष्ट करताना चौघांनी व्हिडीओ बनविला होता. तो व्हिडीओ नंतर राजेंद्र यांचा जावई गोविंद सोनार याला पाठवून गेम ओव्हर असा मॅसेज पाठविला होता. चौकशीत राजेंद्र आणि गोविंद यांच्यात कौटुंबिक वाद होता. गेल्या काही दिवसांपासून हा वाद विकोपास गेला होता. त्यातून रागाच्या भरात गोविंदने त्याचे सासरे राजेंद्र मराठे यांच्या हत्येची संबंधित चारही मारेकर्‍यांना तीन लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यापैकी काही रक्कम त्यांना आधीच देण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे ते चौघेही राजेंद्र मराठे यांच्या मागावर होते.

१४ मार्चला ते मार्केटमध्ये गेल्यानंतर या चौघांनी त्यांना गोड बोलून त्यांची हत्या करुन त्यांच्या हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. हत्येनंतर ते चौघेही नंदूरबार येथून सुरतला पळून गेले होते. मात्र अटकेच्या भीतीने ते बोरिवली येथे आले. रिक्षातून गोराई येथे गेल्यानंतर ते तेथून पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र त्यापूर्वीच त्यांना पोलीस निरीक्षक भरत घोणे व त्यांच्या पथकाने शिताफीने अटक केली. या चारही आरोपींकडून पोलिसांनी राजेंद्र यांचा मोबाईलसह इतर चार मोबाईल आणि ४५ हजार ३३० रुपयांची कॅश जप्त केली आहे. त्यांच्या अटकेची माहिती नंतर नंदूरबार स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आली होती. मुंबईत आलेल्या या पथकाला या चारही आरोपींचा ताबा देण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page